अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना देण्यास प्राधान्य: गणपतराव पाटील
शिरोळ / प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात दत्त भांडार रास्त भाव, आपुलकीची सेवा आणि ग्राहकांची विश्वासार्हता जपत ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुविधा देण्यामध्ये अग्रभागी आहे.या संस्थेची प्रगती चांगल्या पद्धतीने होत असून ही संस्था कर्जमुक्त आहे, ही गोष्ट सहकार चळवळीसाठी प्रेरणा देणारी आहे.ग्राहक आणि सभासद यांचा या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असून यावर्षी 10 टक्के लाभांश देत आहोत.आगामी काळातही अत्याधुनिक सोयी सुविधा,विविध ऑफर ग्राहकांना देण्यास आपण प्राधान्य देवू अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
श्री दत्त कारखाना सभागृहात आयोजित श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या 42 व्या वार्षिक साधारण सभेमध्ये ते बोलत होते.यावेळी सर्व सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व 13 विषयांना एकमताने मंजुरी दिली.संस्थेचे चेअरमन दामोदर सुतार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या वर्षभरामधील कार्याचा आढावा घेतला.ते म्हणाले, बाजारपेठेमध्ये तीव्रतेने वाढत असलेले बाजारभाव,वाढती स्पर्धा,महागाई आणि सहकारी संस्थांचे अस्तित्व यावरील शासन निर्बंधांचे पालन करीत संस्थेने आपली प्रागतिक वाटचाल सुरू ठेवली आहे.तसेच आर्थिक वर्षात संस्थेस 128.67 लाख व्यापारी नफा मिळाला असून नियमाप्रमाणे सर्व तरतुदी करून 4 लाख 45 हजार 312.40 इतका निव्वळ नफा झाला आहे.गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने 1 कोटी 20 लाखाच्या कर्जाची परतफेड केली आहे.तसेच दोन्ही झुणका भाकर केंद्राद्वारे सात्त्विक,पौष्टिक,सकस आहार अल्प दरात देवून सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे साडे तीन लाख ग्राहकांची सेवा करीत असल्याचे समाधान आम्हाला वाटते.संस्थेवर सद्या कोणत्याही वित्तीय संस्थेचे कर्ज नसून सर्व संचालक,सेवकवृंद आणि ग्राहकांचे यासाठी योगदान मोठे आहे.ग्राहकांनी आपला व्यवहार श्री दत्त भांडार मध्येच करावा,असे आवाहनही त्यांनी केले.
शरदचंद्र पाठक,अंबादास नानिवडेकर,रमेश चौगुले यांनी संस्थेच्या प्रगती संदर्भात मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. सर्वांचे स्वागत दामोदर सुतार यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन व सभा कामकाज जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे यांनी पार पाडले. यावेळी गणपतराव पाटील, दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हॉईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सचिव संघटनेचे सरचिटणीस रमेश चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रारंभी एस.ए.घोरपडे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. सूत्रसंचालन संजय सुतार यांनी केले तर आभार दत्त भांडारच्या संचालिका डॉ.सौ.राजश्री पाटील यांनी मानले.यावेळी व्हाईस चेअरमन सौ.अनिता कोळेकर,दत्त कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे, कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,भैय्यासाहेब पाटील,अनंत धनवडे,भूपाल खामकर,बाबासाहेब पाटील, विजयकुमार गाताडे,संस्थेचे सर्व संचालक,याचबरोबर विविध संस्थांचे संचालक,पदाधिकारी,सभासद,सुहास मडिवाळ,दीपक ढोणे,लियाकत सय्यद यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.