प्रदुषण नियंत्रण मंडळ,कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांचे प्रतिपादन
शिरोळ / प्रतिनिधी
श्री दत्त साखर कारखाना एक नैतिक जबाबदारी स्वीकारून नेहमीच प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी यशस्वी काम करीत आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा’ हे ब्रिदच कारखान्याने स्वीकारले आहे. श्री दत्त कारखाना पर्यावरणपूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अग्रेसर आहे, असे प्रतिपादन प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांनी केले.
श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने ‘साखर कारखान्यातील प्रदूषण नियंत्रण,’ या विषयावर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांच्या पर्यावरण अभियंत्यांच्या एक दिवसीय शिबिरात ते बोलत होते.
जयंत हजारे पुढे म्हणाले, कारखान्यामध्ये विविध प्रकल्पाद्वारे सांडपाणी, कारखान्यातील बाहेर पडणारे पाणी यावर प्रक्रिया करुन प्रदूषण नियंत्रण केले जाते. वेळोवेळी प्रयोगशाळेत तपासणी करून चांगल्या प्रकारे प्रक्रिया करुन सांडपाणी व्यवस्थापन केले जाते. सामाजिक बांधिलकी म्हणून शिरोळ पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. दरवर्षी गणेश मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन करण्यासाठी जलकुंडाची व्यवस्था करुन पाणी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
सहकार महर्षी, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
उत्कृष्ट प्रदूषण नियंत्रणाचे काम केल्याबद्दल श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, रोहिदास मातकर, जयदीप कुंभार, सुशीलकुमार शिंदे, तसेच व्ही. एस. आय. पुणेचे शास्त्रज्ञ अमोल देशमाने, कपील उपाध्ये, मिटकॉनचे एकनाथ अल्हाट आणि सर्व साखर कारखान्याचे पर्यावरण अधिकारी उपस्थित होते. या सर्वांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टर द्वारेही विस्तृत माहिती दिली.
वृक्षांना पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पर्यावरण अधिकारी दिपा भंडारे यांनी कारखान्यातील पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांची माहिती दिली. सुत्रसंचालन शेखर कलगी यांनी केले. अधिकारी सुनील पाटील, दिग्वीजय ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.