निवडणूक स्वपक्षातून की महायुतीतून ? जनतेचा निर्णय
आमदार यड्रावकर : शिरोळ विधानसभा लढविण्याबाबत लवकरच घोषणा
जयसिंगपूर / अजित पवार
आपल्याला जनतेने निवडून दिले आहे. जनतेच्या दरबारात जाऊनच आपण शिरोळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर स्पष्टपणे म्हणत आहेत. मात्र, ते स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवतील, की महायुतीतून अशी चर्चाही मतदारसंघात होत आहे.
सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्व. अण्णांच्या पश्चात निवडणूक लढवली. पण त्यांना दोन वेळा अपयश आले. या अपयशातून खचून न जाता पुन्हा त्यांनी जोमाने कामाला लागत जोरदार तयारी केली. बदललेल्या जनमानसामुळे २०१९ मधे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत थेट विधानसभा गाठली.
विधानसभेत पोहोचल्यावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सान्निध्यातून मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. या मंत्रिपदाच्या संधीचे त्यांनी अक्षरशः सोनं केलं. अनेक प्रश्न सोडविले. तालुक्यातल्या प्रत्येक गावात त्यांनी शासन दरबारातून निधी खेचून आणला. त्यांच्याकडे असलेल्या आरोग्यमंत्रीपदामुळे त्यांनी तालुक्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लावले. कोरोना काळातही राज्यभरात त्यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेत ठसा उमटविला.
सध्या राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार यड्रावकर यांच्यात असलेले घनिष्ठ संबंध पाहता यड्रावकर हे महायुतीचे उमेदवार असू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची राज्यात युतीतून सत्ता आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याच गटाचा आमदार झाला पाहिजे, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. भाजपने सध्या तालुक्यात चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार यड्रावकर यांची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. यड्रावकर हे शिंदे गटाकडूनच उमेदवारी घेतील, असे अनेकांचे मत आहे.
पण यड्रावकर आपण जनतेत जाणार, जनतेचे मत आजमावून कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची, हे ठरवणार असल्याचे वारंवार सांगत आहेत. त्यांचे बंधू संजय पाटील- यड्रावकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजर्षी शाहू विकास आघाडी या राजकीय पक्षाची मान्यता आणली आहे. त्यामुळे यड्रावकर हे अपक्ष निवडणूक लढवतात, की शिंदे गटाच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवतात, अथवा स्वतःच्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीकडून निवडणूक लढविण्याचे त्यांनी ठरविले, तर तालुक्यात सध्या अनेकांनी निवडणूक लढविण्याबाबत जोरदार फिल्डिंग लावली आहे. अनेक नेत्यांनी आपला सवता सुभा करण्यास सुरुवात केली आहे. तर मात्र यड्रावकर यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
चौकट
विकासनिधी शिंदेसेनेच्या माध्यमातून
गेल्या पाच वर्षात मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी ज्यांच्या जवळीकतेतून निधी आणला, त्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, असा आग्रह शिंदे गटाकडून होऊ शकतो. विकासनिधी आमच्या गटाचा, मग तुम्ही वेगळी चूल का मांडत आहात, अशीही विचारणा आमदार यड्रावकर यांना शिंदे गटाकडून केली जाऊ शकते.