जोकमार फिरविण्याची कोळी जमातीची पुरातन परंपरा आज ही कायम

Spread the love
हेरवाड / प्रतिनिधी
गणेश हा अभिजनांचा देव तर जोकमार बहुजन,क्षुद्रादी समूहांचे दैवत आहे़. गणेशोत्सवाच्या दरम्यान जोकमारचा येतो.एकूण सात दिवसांचे त्याचे आयुष्य आहे़.कुंभाराच्या घरात जन्म झाला तरी तो वाढतो कोळयांच्या घरात.कोळी जमातीच्या महिला शेणाने सारवलेल्या बुट्टीत बसलेल्या जोकमारला डोक्यावर घेऊन गावोगाव फिरतात त्याची आराधना करतात.नवव्या शतकापूर्वीपासून जोकमार हा लोकदैवत म्हणून पूजला जातो.जोकमार हा दणकट शरीरयष्टीचा,नितळ कांतीचा,गोरा गोमटा हळदीने माखलेला, रुंद कपाळ,मोठे आणि पाणीदार डोळे, कपाळावर विभूती भस्म,मध्ये कुंकुवाचा टिळा, डोक्यावर किरीट,दाट,पिळदार मिशा,बूड टेकून बसलेल्या अवस्थेतील जोकमाराच्या उजव्या हातात मोठी तलवार आहे़.तोंडात लोण्याचा गोळा आणि शिश्नाचा आकार लक्ष वेधणारा मोठा आहे़.जोकमाराच्या या मातीच्या मूर्तीला वेताच्या बुट्टीत म्हणजेच टोपलीत कडुलिंबाच्या पानांत बसविले जाते़.सुख-समृद्धी,धन-धान्य आणि पाऊस-पाण्यासाठी जोकमाराकडे जोगवा मागितला जातो.मूळचा कर्नाटकातील ‘जोकमार’ हा बोलीभाषेत जोकमार स्वामी, जोकप्पा,जोक्या म्हणून ओळखला जातो.पाऊस चांगला पडावा.भरपूर पीक हाती यावे.गावावर कुठलेही संकट येऊ नये.अशी मागणी या जोक्याकडे केली जाते.उत्तर कर्नाटकासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सीमा भागातील गावात अजूनही मानला जातो.दुष्काळाच्या भीतीपोटी गावकरी न चुकता ‘जोक्या’ची आराधना करतात.त्याला डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली जाते.घरोघरी जाऊन ‘जोक्या’ गावकऱ्यांची मागणी स्वीकारतो. बहुजन,कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या इतर दैवतांच्या वाट्याला ज्या अवहेलना आल्या,जे भोग आले,त्यातून जोकमारचीही सुटका झाली नाही़ त्याचेही प्रतिमाभंजन करण्यात आले.जोकमाराला गावावरून ओवाळून टाकलेला फटिंग,अतिशय कामुक आजच्या भाषेत लिंगपिसाट करून टाकले.त्यासाठी त्याच्या शिश्नाचा आकार वाजवीपेक्षाही मोठा असावा.बलवर्धक मानले जाणारे ‘लोणी’ त्याचे मुख्य नैवेद्य असल्याने या तर्काला पुष्टी मिळते.पौर्णिमेच्या रात्री परिटाच्या घरी त्याचे डोके फोडले जाते.भाद्रपद अष्टमीला जन्मतो,पौर्णिमेला मरतो,जोक ऋषी आणि गौरी या दंपतीला अनेक वर्षे अपत्य झाले नव्हते.या ऋषी दंपतीने भगवान शिवाची उपासना केली़ या दंपतीला अत्यंत तेजस्वी सुपुत्र झाला़ तो म्हणजे जोकमार त्याची वाढ झपाट्याने होत असे बऱ्याच दिवसांपासून पाऊस न आल्याने हा जोकमार आपल्या घोड्यावरून शिवारात गेला त्याचा दरारा इतका होता की ढगांनाही कंप सुटला त्याने ढगांवर कांबळ फेकल्याने जोरदार पावसास प्रारंभ झाला जोकमाराच्या या कर्तृत्वाची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली़ तो एका तरूणीवर मोहित झाला.आपल्या अचाट ताकदीच्या बळावर तिला तिच्या मनाविरूध्द भोगण्याचा त्याचा प्रयत्न फसला त्या मुलीच्या वडिलांनी जोकमाराला ठार केले.अशा या जोकमार फिरविण्याची पुरातन परंपरा वर्षानुवर्षे कोळी जमातीकडून जपली जात आहे.
error: Content is protected !!