विषय पत्रकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी
शिरोळ / प्रतिनिधी
शिरटी ता शिरोळ येथील प्रकाश ग्रामीण बिगर शेती
सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी संस्थेचे सभासद कर्जदार ठेवीदार यांचे हित साधत गेल्या तीस वर्षात संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू केली आहे.यामुळे या आर्थिक वर्षात संस्थेला 16 लाखाहून अधिक नफा झाला असून सभासदांना 15% लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन पोपट चौगुले यांनी आज रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता शिरटी येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केली.प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे चेअरमन पोपट चौगुले हे बोलत होते.मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन प्रतिमा पूजन करण्यात आले.दिवंगताना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली.संस्थेचे संचालक आप्पासो मगदूम यांनी स्वागत केले.पतसंस्थेचे व्यवस्थापक आण्णासो मगदूम यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.या सभेत गावातील पहिली महिला पोलीस म्हणून निवड झालेली गीता पाटील,एसआरपीमध्ये निवड झालेले संदीप बाईत, कुस्ती स्पर्धेत यश मिळवलेल्या पै.वेदांत गुरव,सोयाबीन पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेले शेतकरी संजय खवाटे,ऊस उत्पादक शेतकरी अशोक चौगुले,औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन पोपट चौगुले म्हणाले की संस्थेच्या संचालक मंडळाबरोबरच कर्मचारी वर्गाने पारदर्शक काटकसरीने कारभार करून संस्थेची प्रगती साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.सभासद ठेवीदार यांचा विश्वास संस्थेवर असल्यानेच ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून संस्थेकडे 25 कोटी 46 लाख 3 हजार 441 रुपयाच्या ठेवी असून 18 कोटी 17 लाख 19 हजार 573 रुपये कर्ज वाटप केले आहे.संस्थेने यावर्षी चांगल्याप्रकारे कर्ज वसुली केली आहे.त्यामुळे अहवाल सालात संस्थेला 32 लाख 50 हजार 497 रुपये इतका ढोबळ नफा झाला असून इतर तरतुदी वजा केला असता संस्थेला 16 लाख 57 हजार 499 रुपये इतका नफा झाला आहे.या नफ्यातून सभासदांना 15% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, अशोक चौगुले,आण्णासो चौगुले आपले मनोगत व्यक्त करत असताना प्रकाश पतसंस्थेने चांगला कारभार करून संस्थेचे प्रगती साधली असल्याचे सांगितले.दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल यांनी आपल्या जवानांकडून आपत्ती व संकट काळात मदत करून अनेकांना जीवनदान कसे दिले याची माहिती दिली. तसेच आपल्याला अत्याधुनिक यंत्रसामुग्री साहित्य मिळाले तर नागरी जीवन सुरक्षित करण्यासाठी आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न असतील असे सांगितल्यानंतर प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी या वजीर रेस्क्यू फोर्सला 15 हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली.आणि परिसरातील उद्योगपती विविध संस्थांनीही मदत करावी असे आवाहन केले.यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत उदगांवे, संचालक बापूसो पाटील,बापू रोजे,कुबेर मगदूम,महावीर खवाटे,जनपाल शिरगांवे, आण्णासो सुतार,आप्पासो मगदूम,संजयकुमार बंडगर, विश्वास कांबळे,सौ सुरेखा उदगांवे, श्रीमती सुनिता पाटील, सल्लागार संचालक राजकुमार कोगनोळे,शांतिनाथ चौगुले, भास्कर चौगुले,संस्थेचे मॅनेजर आण्णासो मगदूम व सचिन खोबरे यांच्यासह सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.