सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली उरले अवघे काही दिवस…
कुंभोज प्रतिनिधी / आकाश शिंदे
महाराष्ट्रातील तरुणांचा महत्वाचा असलेला उत्सव म्हणजे गणेशोत्सव अवध्या एक आठवड्यावर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात गणेश उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक मंडळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. गणेशोत्सवासाठी आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई, देखावे, सजावट, महाप्रसाद विविध जनजागृती, धार्मिक कार्यक्रम आदींचे आयोजन करतात, त्याची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मंडळाचे मंडप उभारण्याचे कामे पूर्णत्वाकडे गेले आहेत. मंडपातील अंतर्गत सजावटीची कामे मंडळातील सदस्य, कार्यकर्ते पूर्ण करू लागलेल्या आहेत. यामध्ये तरुणा बरोबर वयस्कर नागरिक, बालचमूही सहभागी झालेले दिसत आहेत. बालचमू अग्रभागी लुडबुड करताना दिसत आहेत. ग्रामीण भागात अनेक उत्साही तरुणांच्यामुळे अनेक मंडळे स्थापन होऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. तसेच ग्रामीण भागातील गणेशोत्सवात महाप्रसाद हा मंडळाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. गणेशोत्सवापासून अनंत चतुदर्शीपर्यंत महाप्रसादाचे दररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी वाटप होते. त्यासाठी विविध पदार्थ तयार करणे व त्याचा महाप्रसाद वाटप करणे याचे नियोजन चालू असत्याचे दिसत आहे. महाप्रसादासाठीही ग्रामीण भागातील अनेक मंडळे लाखो रुपये खर्च करतात. यासाठी मंडळातीत्त सदस्यच स्वखर्चाने सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करीत आहेत. अनेक मंडळे गणेश आगमन व विसर्जन यासाठी पारंपारिक वाद्य, बैंड, बॅन्जो, झांजपथक, लेझीम, डॉल्बी अन्य वाद्य यांचे नियोजन सुरू आहे. एकंदरीत आगामी गणेशोत्सवासाठी ग्रामीण भागात तरुणात मोठा उत्साह असून त्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे दिसत आहे.