पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
वारणा विद्यापीठाच्या उद्घाटनसाठी येणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा ताफा आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून वारणेकडे प्रस्थान व विमानतळाकडे परतीचा प्रवासा दरम्यान दोन्ही प्रवासावेळी एक तास पुणे बेंगलोर हायवेवरील वाहतूक ठप्प केल्याने हायवेवर शुकशुकाट पसरल्याचे दिसून आले. पण ठिकठिकाणी नागरिकांनी मार्गाच्या कडेला उभे राहून राष्ट्रपतींच्या ताफ्याकडे नजरा लावून पाहतच होते.कारण देशाचे सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती असल्याने त्यांच्या ताफ्याचा व बंदोबस्त कशा प्रकारचे नियोजन पोलिस दलाकडून करण्यात येते यांच्या ताफ्यात किती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतो याचे दृश्य पाहाण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या नजरा सकाळपासून लागल्या होत्या.त्यांचा ताफा कधी वारणेकडे जाणार याची वेळच माहित नसल्याने नागरिकांना दिवसभर ताटकळत वाट पाहत उभे रहावे लागले.पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रपती यांच्या बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन केले होते.त्यासाठी वाहतुकीवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल याची रंगीत तालीम ही घेण्यात आली होती.त्यानुसार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास यशस्वी झाले.पण पोलिसांनी वाहतुक ठिकठिकाणी तास तासभर रोखून धरल्यामुळे प्रवासात नागरिक व वाहनधारकांचे हाल झाले.