हरकती घेतलेल्या नागरिकांना पालिकेकडून नोटीसा
शिरोळ / प्रतिनिधी
प्रारुप विकास योजना शिरोळ नगरपरिषदकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) अन्वये विकास आराखडाअंतर्गत शहरात टाकलेल्या जमिनी आरक्षणा संदर्भातील प्रसिध्दीवर प्राप्त सूचना हरकतीच्या अनुषंगाने शिरोळ पालिकेत मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.
या सुनावणीस उपस्थित राहण्याच्या नोटिसा नगरपरिषदकडून हरकती घेतलेल्या नागरिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिली.
शिरोळ नगरपरिषदेकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करीत असताना नागरिकांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले आहे.
या विकास आराखड्यातील जमिनी आरक्षणासंदर्भात शहरातील नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत या संदर्भातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना/हरकतीच्या अनुषंगाने,महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (२) अन्वये गठीत नियोजन समितीसमोर सुनावणी होणार आहे.
हरकती घेतलेल्या नागरिकांना म्हणणे मांडण्यासाठी मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी १० वाजता शिरोळ नगरपरिषदेमध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अथवा हरकत घेतलेला नागरिकांचा प्रतिनिधी हजर राहणार असल्यास,सदर प्रतिनिधीस आवश्यक ते प्राधिकारपत्र देण्यात यावे,
हरकत घेतलेले नागरिक हजर न राहिल्यास आपल्या संदर्भिय अर्जातील मुद्यांच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल अशा आशयाची नोटीस नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी हरकती दाखल केलेल्या नागरिकांना दिल्या आहेत.