दत्त साखर कारखान्याच्या क्षारपड शोध प्रबंधाचे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शुगरकॉन-2024 आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला “सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा “क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम” या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे.

 

 

दि. 16 ते 19 सप्टेंबर 2024 दरम्यान आय.सी.आय. एस. एफ.,क्यू न्होन,रिन्ह दिन्ह व्हिएतनाम येथे आयोजित 8 व्या आय.ए.पी.एस.आय.टी.आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन 2024 परिषदेत याचे मौखिक सादरीकरण होणार आहे,अशी माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

“लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव-ऊर्जा उद्योग: साखर क्षेत्राचे रूपांतर” या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला 20 साखर उत्पादक देशांतील 250 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.समकालीन साखर उद्योगाच्या सर्वसमावेशक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या या परिषदेला प्रख्यात साखर पीक तज्ज्ञ,संशोधक,

 

 

साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ यांच्यासह उद्योग व्यवस्थापक, धोरणकर्ते आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. शुगरकॉन-2024 परिषदेनंतर विविध साखर कारखान्यांना भेट दिली जाईल.
शुगरकॉन-2024 ही इतर साखर उत्पादक देशांच्या सदस्य/संस्थांसह बहु-भागधारक भागीदारी प्रवास तयार करण्याची आणि जागतिक स्तरावर संशोधन/व्यावसायिक संधी शोधण्याची एक उत्तम संधी असेल.

 

 

शुगरकॉन-2024 चे आयोजन सचिव जी. पी. राव यांनी सहभागी होण्यासाठी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.जयपूर, राजस्थान येथे शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने “सलग ऊस पीक जमिनीमध्ये घेतले तर जमिनीचा कस कमी होतो असा समज होता,

 

 

परंतु कारखाना माती परीक्षण विभागाकडे उपलब्ध सर्व माती अहवालानुसार जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला तर जमिनीचा कस कमी होत नाही,” असा संशोधन प्रबंध सादर केला होता.त्यावेळी कोईमतुर येथील शास्त्रज्ञ श्री बक्षीराम यांनी कारखान्याने क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाची प्रशंसा केली होती.तसेच इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्ससाठी एक संशोधन पेपर सादर करण्यास सांगितले होते.

 

त्यानुसार कारखान्याकडून वरील संस्थेकडे प्रबंध सादर केला होता. त्या प्रबंधाची इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्स मध्ये निवड झाली आहे.यावेळी संचालक इंद्रजित पाटील, महेंद्र बागे, बाळासाहेब पाटील हलसवडे, ऍड. प्रमोद पाटील, श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, माती परीक्षण विभाग प्रमुख ए. एस. पाटील,

अंबादास नानिवडेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!