कुरुंदवाड / प्रतिनिधी
महापुराचा सामना करण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था,बँका,मंडळे,प्रतिष्ठित नागरिक यांच्या लोकवर्गणीतून स्थलांतरित कुटुंबांच्या जीवनावश्यक वस्तूच्या गरजा पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून ही मदत पुरवठा केली जाणार आहे. स्थलांतरसाठी शहरातील सामाजिक मंडळांनी आणि नागरिकांनी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी केले.
कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शनिवारी सायंकाळी 4 वाजता बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला सपोनि रविराज फडणीस,एस टी डेपोचे व्यवस्थापक नामदेव पतंगे,आरोग्य अधिकारी रेखा तराळ,तलाठी प्रतीक्षा ढेरे,वीज वितरण कंपनीच्या संगीता पाटील पशु वैधकीय अधिकारी डॉ.प्रमोद झेंडे आदी प्रमुख उपस्थित होते.
याबैठकीत निवारा केंद्रे,चारा छावणी,स्थलांतरसाठीच्या वाहनांच्या सुविधा,पुरग्रस्तांच्या जेवणाची सोय व एकंदरीत सर्व महापुरावर प्रशासनाचे नियंत्रण काय यासह आदी प्रश्न माजी नगरसेवक राजू आवळे, तानाजी आलासे, बाबासाहेब सावगवे,दयानंद मालवेकर यांनी उपस्थित केला.काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
यावेळी उदय डांगे,दादासाहेब पाटील,रमेश भुजुगडे, अभिजित पाटील यांनी कुरुंदवाड आणि परिसर शेती शेतीवर आधारित दुग्ध उत्पादन व्यवसायावर विसंबून आहे.शेती पाण्याखाली गेली आहे.पुरग्रस्तांचे आणि जनावरांची प्रशासनातर्फे सोय करावी अशी मागणी केली.
यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी चौहान म्हणाले 6 निवारा केंद्रे नियुक्त करण्यात आली आहेत. स्थलांतरासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. जनावरांच्या वैरणीसाठी कृषी विभागाला जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत.त्याची ही सोय होईल आरोग्य विभाग,वीज वितरण कंपनी आणि एस.टी डेपो ही सतर्क आहेत असे सांगितले.
यावेळी अरुण आलासे,राजेंद्र बेले,आर्षद बागवान,रघु नाईक,उमेश कर्नाळे,बबलू पवार,शंकर पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.