“अन्यथा निलंबनाची कारवाई” पालकमंत्री मुश्रीफ यांचा इशारा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील नद्यांची पाणी पातळी धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे.त्यामुळे प्रशासनाने पूरग्रस्तांना निवारा व जनावरांना निवारा शेड व चारा तातडीने उपलब्ध करून द्यावा.ग्रामसेवक,तलाठी यासह इतर शासकीय कर्मचारी आपत्तीकाळात आपला सज्जा सोडून बाहेर जात असतील तर अशांवर निलंबनाची कारवाई करणार पूरग्रस्तांना गैरसोय होईल,अशी कोणताही हलगर्जीपणा प्रशासनाकडून होता कामा नये. शासन पूरग्रस्तांच्याबरोबर आहे.पूरग्रस्तांना सर्व सोयीसुविधा पुरवणार असल्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

 

शिरोळ येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेऊन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यासह प्रशासन घेऊन शिरोळ येथे शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास तातडीची आढावा बैठक घेऊन पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनाला सक्तीच्या सूचना केल्या.

 

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी आपत्तकालीन रस्ते आहेत, अशा रस्त्यांवर तातडीने खड्डे भरून वाहन जाण्याची सोय करावी.तहसिलदार, गटविकास अधिकार्‍यांनी प्रत्येक गावाचा दररोज आढावा घ्यावा. तालुक्यात पूरग्रस्तांना निवारा शेड, जनावरांना निवारा शेड व चारा तातडीने उपलब्ध करून द्यावा. शिरोळ तालुक्यात चार नद्या असल्याने पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक बाधीत होणारा हा तालुका आहे.

 

अलमट्टीतून विसर्गाबाबत शासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी गावातील शासकीय अधिकार्‍यांशी संपर्क करा.अधिकारी आपत्तीकालात गावात नसतील तर त्यांना निलंबीत केल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह आरोग्य, महावितरण, महामंडळ यासह सर्व शासकीय अधिकार्‍यांना महापुराबाबतच्या सूचना केल्या. त्यानंतर तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी तालुक्यातील महापुराबाबत माहिती प्रशासनासमोर मांडली. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. कार्तिकेयन यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.

 

यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, प्रांताधिकारी मोसमी चौगुले-बर्डे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर, मुख्याधिकारी टिना गवळी, निशिकांत प्रचंडराव, राजवर्धन नाईक-निंबाळकर, डॉ.अरविंद माने, राकेश खोंद्रे, मुकुंद गावडे यांच्यासह सर्व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!