शिरोळ : प्रतिनिधी
समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याकरिता प्रत्येकाने आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना जपली पाहिजे.याकरिता स्वतःचा पैसा व वेळ खर्च करून रोटरी या जागतिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीकरिता काम करत सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे.
समाजकार्यातील रोटरी हा परिसस्पर्श आहे.११८ वर्षे झाली आयुष्याचे सोने करण्याची संधी रोटरी देते.या माध्यमातून कायमस्वरूपी टिकणारे सामाजिक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अँड इस्माईल पटेल यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा माने -देशमुख मंगल कार्यालय येथे रोटे.इस्माईल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला.या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राष्ट्रगीत,विश्वशांती प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या सोहळ्याची सुरुवात झाली.
डॉ. अतुल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.मावळते प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे यांनी आपल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला.वर्षभरातील कामकाजात योगदान देणाऱ्या रोटरी सदस्यांचे कौतुक करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.इस्माईल पटेल यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन अध्यक्ष रोटे.तुकाराम पाटील (भैय्या), सचिव मेजर प्रा.के.एम.भोसले, खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
या समारंभात बोलताना रोटे. इस्माईल पटेल पुढे म्हणाले की आयुष्यातील बराचसा वेळ हा झोप,प्रवास,खानपान यावरती खर्च होतो.जितका वेळ आपणास उपलब्ध होतो तो सत्कारणी लावावा.चिंता ही माणसांस लागलेली कीड आहे.चिंता ही नेहमी सतावत असते म्हणून चिंता सोडून दिली पाहिजे.
रोटरी क्लबच्या माध्यमातून काम करत असताना ऑन गोईंग प्रोजेक्ट म्हणजे शिरोळकर असा नावलौकीक मिळवा.काम करण्याची इच्छाशक्ती हवी.तुमची श्रीमंती ही किती मिळविता?यापेक्षा किती देता?यावर असते. मेंदूचा वापर हा समाजाच्या कल्याणासाठी करा.उत्साह, पैसा व वेळ यांचा मेळ घाला तरच आयुष्य सुखमय होईल.
रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडगाणे यांनी रोटरी क्लबच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन देत रोटरीच्या कार्याची माहिती दिली.नूतन अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांच्यासमवेत विविध उपक्रम राबवून शिरोळच्या सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आश्वासन दिले.
या समारंभास माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी आमदार उल्हास पाटील,माजी नगरसेवक पै.प्रकाश गावडे, एन.वाय.जाधव,दयानंद जाधव,रोटरी क्लब सदस्य विवेक मोजे,संजीव पाटील,राजन राजोपाध्ये,रोटरी हेरिटेज सिटीचे डॉ.अरविंद माने,डॉ.अजितकुमार बिरनाळे,
डॉ. उमेश कळेकर,संजीव पुजारी, राहुल यादव,आप्पालाल चिकोडे,डॉ.सुभाष भंडारे,सुरेश देशमुख,विराजसिंह यादव,वेदमूर्ती अनिकेत जोशी,संदीप कांबळे, संजय रामचंद्र शिंदे,उल्हास पाटील,शरद उर्फ बापू मोरे, रणजीत जगदाळे,श्रीकांत जाधव,गजानन पाटील,
शिवाजी कोळी,भरत गावडे,सचिन सावंत,महेश माने यांच्यासह शिरोळ,जयसिंगपूर व कुरुंदवाड रोटरी क्लबचे पदाधिकारी,पत्रकार,विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले.आभार मेजर प्रा.के.एम.भोसले यांनी मानले.पांडुरंग पोळ यांनी पसायदान गायन केले.