सावर्डे इथं सांगलीतील सराईत गुन्हेगाराचा मृतदेह….
सावर्डे येथील डोंगरातील निर्जनस्थळी सांगलीतील संजय नगर मधील 33 वर्षीय सराईत गुन्हेगार सागर चंद्रकांत शेंडगे याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत गुरुवारी सायंकाळी निदर्शनास आला.मृत सागर शेंडगे याच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हा खून केला असल्याचे तोंडी तक्रार केली आहे.
सांगली जिल्ह्यातील सांगलीतील संजय नगर मधील सराईत गुन्हेगार सागर चंद्रकांत शेंडगे वय वर्षे 33 याचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील आवळे फार्म हाऊसच्या पिछाडीस असणाऱ्या गायरान मध्ये गुरुवारी मेंढपाळ मेंढ्या करण्यासाठी गेले होते.झुडपाच्या दिशेने दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना सडलेला मृतदेह आढळला.ही घटना त्यांनी गावांमध्ये सांगितली.गावातील पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती पेठवडगाव पोलिसांना देताच पेठ वडगाव पोलीस ठाण्यातील पीएसआय भरत पाटील, तात्यासाहेब मुंडे, प्रमोद चव्हाण, अमन मकानदार, मिलिंद टिळे, महेश गायकवाड, रियाज मुलानी, जितू पाटील, यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी झुडपामध्ये पूर्णपणे सडलेला मृतदेह आढळला. मृतदेह शेजारी पिकावर मारण्यात येणाऱ्या कीटकनाशक औषधाची बाटली आढळून आली.तर मृत सागर शेंडगे याची मोटरसायकल क्रमांक MH 10 EG 3440 ही पडलेल्या अवस्थेत होती.गाडीच्या नंबर वरून नातेवाईकांना शोधून काढण्यात आले.दरम्यान शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मृतदेह सावर्डे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 8 वाजता पेठ वडगाव पोलीस ठाण्यातुन मिळाली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळीनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.ही आत्महत्या नसून हा खून असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.सागर शेंडगे याच्यावर सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे.एका खंडणीच्या गुन्ह्यात सांगली पोलीस त्याचा शोध घेत होते. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून तो पोलिसांना चकवा देत लपून-छपून राहत होता.मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने दोन दिवस तपासामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.पेठ वडगाव पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.