कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड येथील शिरढोण रस्त्यावर इचलकरंजी महानगरपालिकेच्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा गळती लागली आहे.हेरवाड-शिरढोण फाट्यावरील महेंद्र टायर दुकान गाळ्यातील कोबा आणि खानावळीतील जमिनीचा काँक्रीटचा कोबा उचकटून शेडचा पत्रा फाटला आहे.
मंगळवारी सकाळी गळती मोठ्या प्रमाणत लागल्याने अजितसीह देसाई यांच्या शेतातील सरी पाण्याने तुडुंब भरले आहेत.लगतच असणारी विहीर पाण्यावर तुडुंब भरली आहे.अचानक पाणी झाल्याने खानावळीत ही पाणीच पाणी झाले होते.
व्यावसायिकानी गॅस सिलिंडर,गॅस शेगडी,भांडी, मसाल्याचे पदार्थ,टेबले,खुर्च्या व इतर साहित्य बाहेर काढताना तारांबळ उडाली.सना रेडियम मध्येही पाणी घुसले.त्यामुळे तिन्ही दुकानांतील साहित्याचे व दुकान गाळ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोठया प्रमाणात गळती होवून पाणी वाहत होते.त्यामुळे शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे.मातीसह पाणी विहिरीत गेल्याने विहीर व शेती जलमय झाले होते.
या अचानक गळतीची इचलकरंजी महापालिकेला माहिती दिल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र इचलकरंजीपर्यंतचे पाणी उलट येत असल्याने उशिरापर्यंत पाणी येत होते.