कुरुंदवाड / प्रतिनिधी
यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने लोकामध्ये महापूराची भीती असून महापूर येवू नये यासाठी शासनदरबारी दबावगट निर्माण करण्यासाठी व उपाययोजनांचा उहापोह करण्यासाठी 16 जून रोजी नृसिंहवाडी येथे तिसरी पूर परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे व ज्येष्ठ अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कुरुंदवाड येथील टेनिस क्लब येथे आज सकाळी 11 वाजता पूर परिषदेच्या पार्श्वभूमीवर बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आंदोलन अंकुशच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून महापूराच्या कारणांचा शोध व उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
यंदाही पूर परिषदेच्या माध्यमातून महापूराच्या प्रश्नाची तीव्रता व कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न व्हावेत यासाठी जागर केला जाणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ अभ्यासक विजयकुमार दिवाण म्हणाले, महापूरप्रश्नी अलमट्टीचा बागुलबुवा पुढे करण्यात आला असला तरी हिप्परगी बंधाऱ्याचे बॅकवॉटर हे मूळ कारण असून त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
धनाजी चुडमुंगे म्हणाले,जगभरातील आपत्तीवर त्या त्या देशानी उपाययोजना करुन मात केली मात्र महाराष्ट्र शासन महापूर प्रश्नी अपयशी ठरले आहे.आतापर्यंत चार महापूर आम्ही सोसले मात्र यापूढे सोसणार नाही
त्यामुळे शासनाने थातूरमातूर उपाययोजना न करता ठोस कार्यवाही करावी.अलमट्टीपेक्षा हिप्परगी बंधार्यापासून महापूराचा धोका आहे त्याचा अभ्यास करावा. पावसाळ्यात हिप्परगी बंधाऱ्याचे बरगे काढून टाकावेत.
कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती सांगलीचे निमंत्रक सर्जेराव पाटील म्हणाले,महापूर हा कृष्णाकाठी चिंतेचा विषय बनला आहे.यंदा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज
ठेवावी.अलमट्टी हिप्परगी ते राजापूर बंधाऱ्यापर्यंत शासनाने लक्ष ठेवावे यासाठीच पूर परिषदेत चर्चा घडवून आणणार आहे.यावेळी राकेश जगदाळे,आप्पासो कदम, महादेव माने,उध्दव मगदुम,सुयोग हावळे,संजय कोरे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.