पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
बिरदेवाच्या नावानं चांगभलं, गारड्या देवाच चांगभलंच्या जय घोषात पुलाची शिरोली ( ता.हातकणंगले) येथे श्री काशिलिंग बिरदेव जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. सकाळपासूनच मंदिरामध्ये श्री बिरदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती.
शिरोली गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आणि भक्तांच्या हाकेला धावणारा काशिलिंग बिरदेव जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तीमय आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. दरम्यान हा जन्म काळ पार पाडण्यासाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते.
शिवाय धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी येथील सुतार यांच्या घरी पाळणा तयार करण्यात आला.त्यानंतर देव माळी येथे ढोल कैताळाच्या निनादात पाळणा आणण्यात आला पाळणा व मंदिर आकर्षक फुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाई सजवून धनगर समाजातील सर्व पुजारी मानकरी यांनी आरती करून पाळणा ढोल, कैताळच्या निनादात काशिलिंग बिरदेव मंदिरामध्ये आणण्यात आला.
पहाटे ५ वाजता देवाचा अभिषेक करण्यात आला. सकाळी सात वाजता पुजारी,गाव कामगार पाटील, धनगर समाजातील मान्यवर व सर्व मानकर यांच्या उपस्थित जन्मकाळ सोहळा पार पडला.यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना सुटवड्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान सकाळी महाप्रसाद वाटपा करण्यात आले,रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम व जागरन पार पडला.