जिद्द,चिकाटी आणि मैत्रिणीची व गुरुकुल मधील शिक्षकांची मोलाची साथ या ताकदीवर जन्मत:च अंधत्व वाट्याला आलेल्या इचलकरंजीमधील कु.निहारिका पवन कासलीवाल विद्यार्थिनीने बारावी बोर्ड परीक्षेमध्ये ९२% गुण मिळवून जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये पहिले स्थान मिळवले.
मुळचे राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील निहारिकाचे वडील श्री.पवन शांतीलाल कासलीवाल हे शहरात टेक्सटाईल एजन्ट म्हणून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. पत्नी भावना कासलीवाल गृहिणी असून निहारिकाचा मोठा भाऊ मोहित हा सुद्धा अंध असून सध्या मुंबई मधून बी.टेक द्वितीय वर्षांमध्ये शिक्षण घेत आहे
निहारिकाला वयाच्या 10 व्या वर्षी डोळ्याचा पडदा कमजोर असल्याचे निदान होऊन रेटिना पिगमन या असाध्य आजाराने ग्रस्त झाल्याने शंभर टक्के डोळ्यास दिसायचे बंद झाले. गेली दहा वर्षे हैद्राबाद येथील नेत्र रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरुच आहेत. पण तिने नियतीसमोर हार न मानता अंधत्वावर मात करण्यासाठी निहारिका तिची मैत्रीण निधी हिच्या डोळ्याने अभ्यास करु लागली. शंभर टक्के दिसत नसतानाही केवळ ऐकून व लक्षात ठेऊन निहारिकाने परीक्षा दिली व बारावी बोर्ड मध्ये ९२% टक्के गुण घेत डोळस असलेल्यांना लाजवेल असं यश संपादन केलं आहे. या यशाच्यामागे निहारिकाची मैत्रीण निधी हिची मेहनत देखील खूपच महत्वाची आहे.भविष्यात निहारिकाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायची इच्छा आहे त्यासाठी तिच्या पालकांनी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. गुरुकुल अकॅडमीचे चेअरमन गणेश नायकुडे यांनीही निहारिकाचे यश सर्वांना प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी स्वतःला मर्यादा घातलेल्या असतात अशावेळी आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येत असल्याचे निहारिकाने सिध्द केल्याचे सांगून तिचे अभिनंदन केले.निहारिकाला तिच्या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये कॉमर्स विभाग प्रमुख प्रा.टी.एन.हिंगणगावे सर यांचे तसेच सर्व स्टाफचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तिच्या पालकांनी सांगितले व त्यांनी सर्व गुरुकुल परिवाराचे आभार मानले.निहारिकच्या निकालाचे व गुरुकुलच्या अनमोल मार्गदर्शनाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.