कुरुंदवाड : प्रतिनिधी
मोहनज्योती वनमार्ट शेअर ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक करायला लावून दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून दाम्पत्यासह चौघांनी संगनमताने 8 लाखाची फसवणूक केलेप्रकरणी चार जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी पुरंदर श्रीपाल केस्ते,अतिश अशोक आलगुरे (दोघे.रा.गौरवाड ता. शिरोळ) या दोघांना पोलिसांनी मंगळवारी रात्री 11 वाजता अटक करून आज बुधवारी दुपारी 3 वाजता जयसिंगपूर येथील जिल्हासत्र न्यायालयात उभे केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.फिर्यादी महेश बबन जाधव(वय 32,रा.गौरवाड ता. शिरोळ) याने 17 जून 2023 रोजी फसवणुक केलेप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विजय मोहन होनकांबळे, रेशमा विजय होनकांबळे (दोघे रा.अथणी,जि.बेळगाव),पुरंदर श्रीपाल केस्ते,अतिश अशोक आलगुरे (दोघे.रा.गौरवाड ता.शिरोळ)या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र वर्षभरात पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने 15 तारखेपासून पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.संशयित आरोपींनी ते स्वतःच मोहनज्योती वनमार्ट या शेअर ट्रेंडिंग कंपनीचे मालक,कमिटी मेंबर व प्रमोटर असल्याचे दाखवत विश्वास संपादन करून दरमहा 5 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत महेश जाधवकडून 8 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.संशयित आरोपींनी पीडित जाधवला प्रॉमिसरी नोट व धनादेश दिले होते.दाम दुपटीचा परतावा न दिल्याने सदरचा धनादेश बँकेत भरला असता बँकेने खाते ब्लॉक केल्याचा अहवाल दिल्याने संशयित आरोपींनी फसवणूक केलेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.