राजू शेट्टी यांच्या मनात नेमके चाललेय तरी काय?

Spread the love

राजू शेट्टींची भूमिका एकला चलो रे का? एकटाच चलो शेट्टींच्या भूमिकेमुळे नागरिकात संभ्रम

जयसिंगपूर / अजित पवार

शेतकर्‍यांच्या उसाला दर मिळवून देऊन माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी मतदारांची मने जिंकली आहेत. पण सामान्य कष्टकरी जनतेपासून ते मात्र अलिप्त झाले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणात शेट्टी यांनी ’एकला चलो रे’ का ’एकटाच चलो ’ भूमिका घेतली आहे. पण हीच एकलाच चलोची भूमिका त्यांना त्रासदायक ठरत आहे. वेळीच तडजोड केली असती तर पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा त्यांच्या कार्यकर्त्यांना गाठता आली असती. यामुळे नागरिकांत उलट सुलट संभ्रम निर्माण झाला आहे.

 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी २००९ साली तत्कालीन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत लोकसभा गाठली. २०१४ साली मोदी लाटेवर बसत पुन्हा लोकसभेचे मैदान मारले. पण २०१९ साली झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेला प्रचार त्यांना महागात पडला. मतदारांशी नवखा उमेदवार असलेल्या खासदार धैर्यशील माने यांनी त्यांना धूळ चारली. पण राजू शेट्टी यांनी आसूड ओढण्याचे काम थांबवले नाही. राज्यात असलेल्या महाविकास सरकारला त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात महायुतीची सत्ता आली.याही वेळी राजू शेट्टी यांनी पुन्हा सत्ताधार्‍यांचे विरोधात रणसिंग फुंकले.

 

पण सध्या राजकीय वातावरण बदलले आहे. केंद्रातील मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत हटवण्यासाठी इंडिया आघाडीने चंग बांधला आहे. तर ’आपकी बार मोदी सरकार’ म्हणत कोणत्याही परिस्थितीत ४०० चा आकडा गाठायचाच असा होरा भाजप सरकारचा आहे. या दोन्ही आघाड्यांच्या नीतीमुळे राजू शेट्टी सध्या या दोघांपासून अलिप्तच आहेत. एकला चलो रे अशी भूमिका त्यांनी सध्या घेतली आहे. पण त्यांची ही भूमिका मारक ठरेल का तारक ठरेल हे निवडणूक निकालानंतरच समजून येणार आहे.

 

वेळोवेळी बदलणार्‍या राजकीय समीकरणात राजू शेट्टी यांनी तडजोडीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. पण तो केवळ स्वतःपुरताच मर्यादित राहिला. वेळीच तडजोड केली म्हणून तत्कालीन मित्र असलेले माजी मंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर गेले. पण कालांतराने भाजपचे आणि त्यांचे बिनसले यामुळे या दोघात दुफळी निर्माण झाली. या निर्माण झालेल्या दुफळीचा लाभ भाजप सरकारने उठविला. राज्यात सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद बहाल करून आपल्या बाजूने त्यांना राजू शेट्टींच्या विरोधात बोलते केले. हा एक एकला चलो रे चा टप्पा झाला असेल असे वाटते.

 

 

पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडून आलेले भारत भालके, देवेंद्र भुयार हे आमदार यांनी तडजोडी केल्या तर माजी आमदार उल्हास पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी फारकत घेत विधानसभा गाठली. हे न विसरण्याजोगे आहे. त्यातच रविकांत तुपकर हे आता राजू शेट्टी यांच्यापासून दुरावले आहेत. सामान्य कार्यकर्त्याला पुढे जाण्यासाठी राजू शेट्टी उभारी देतात की नाही. हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच आहे. ’एकलाच चलो’ का ’एकटाच चलो’ हा मात्र वाक्यप्रचार आता राज्यभर मोठ्या प्रमाणावर पसरू लागला आहे.

 

 

सध्या राजकीय परिस्थितीत इंडिया आघाडी राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहू शकेल असे सुतवाच आहेत. पण राजू शेट्टी हे मात्र आपल्याला बाहेरून पाठिंबा मिळावा यासाठी झटत आहेत. तर महायुतीची आपल्याला साथ मिळावी तेही बाहेरूनच मिळावी अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. दोन्ही दरडीवर हात ठेवल्यामुळे कोणत्या राजकीय समीकरणाला राजू शेट्टी हे गवसणी घालत आहेत. असा मतप्रवाह मतदारसंघात उमटू लागला आहे.

 

 

शेट्टी यांनी वेळीच तडजोड इतर कार्यकर्त्यांबाबत केली असती तर अनेक कार्यकर्त्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा अथवा कोणत्या ना कोणत्या महामंडळाचे अध्यक्षपद भूषविता आले असते. पण राजू शेट्टी हे तडजोड केवळ आपल्या पदासाठीच करत आहेत का? असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांनी नुकताच शाहू महाराज यांना पाठिंबा दर्शविला असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील मार्ग सुखकर होईल असा त्यांचा कयास आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे.

 

 

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असे सुतोवाच देणारे प्रा.डॉ. जालिंदर पाटील यांना जर साम-दाम-दंडची उभारी दिली तर ते नक्कीच मजल मारू शकतील असे वाटत आहे.पण राजू शेट्टी यांच्या मनात नेमके काय चालले आहे. हेच मात्र कार्यकर्त्यांना समजू येत नाही.यामुळे अनेकांचा पत्ता कट झाला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सद्या संभ्रमावस्था आहे.

error: Content is protected !!