एकाचवेळी चार जणांचा खून करणाऱ्या आरोपी प्रदीप जगताप (वय ३५ वर्षे) याला आज मंगळवारी दुपारी 1 वाजता जयसिंगपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.६ ऑक्टोबर २०१८ रोजी जगताप याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी रुपाली जगताप, सासू छाया आयरेकर,मेव्हणी सोनाली रावण, मेव्हणा रोहित आयरेकर यांना मागाच्या लाकडी माऱ्याने गंभीर जखमी करून निर्घृण खून केला होता.जयसिंगपूर सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेत शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आय.एस.पाटील यांनी प्राथमिक तपास करून व सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस.हारुगडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.बी.गुरव यांच्यासमोर भा.द.वि.सं. कलम 302 प्रमाणे चालवण्यात आला. या प्रकरणात एकूण 24 साक्षीदारांची तपासणी सरकारी वकील ॲड.विद्याधर सरदेसाई यांनी सरकारी पक्षातर्फे केली.या बाल साक्षीदार म्हणून आरोपीची मुलगी सानवी ही प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने तिची साक्ष निकालात महत्त्वाची ठरली.आरोपीच्या जप्त केलेल्या कपड्यांवर मयतांच्या रक्ताचे डाग व घटनेपूर्वी झालेले भांडण अन्य साक्षीदारांनी सांगितले.वैद्यकीय अधिकारी व प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष देखील महत्त्वाची ठरली.या सर्व साक्षी व सरकारी वकिल ॲड. सरदेसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती गुरव यांनी आरोपी प्रदीप जगताप यास भा.द.वि.सं. कलम 302 प्रमाणे सामूहिक खूनाप्रकरणी दोषी धरले होते. शिक्षेबद्दल दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद ऐकून ही घटना दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीस मरेपर्यंत फाशी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील ॲड. विद्याधर सरदेसाई यांनी चालवलेल्या एकूण 68 प्रकरणांच्या शिक्षांमधील ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे. ॲड. यु. एम. कुलकर्णी, शहापूर पोलीस ठाण्याचे सतीश कांबळे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे हनुमंत बंडगर यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेतले.