वाठार ता.हातकणंगले येथील पुलाजवळ काँक्रिट मिक्सर मशीन लावत असताना मजुरांना ट्रकने उडविल्याने भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घडली.चार जण ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले.भादोले येथील रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मजुरांची टोळी शिये येथून आपले काम आटोपून टेम्पो एम एच ०९ सी ए – ९०९० मधुन भादोलेकडे निघाले होते.टेम्पोला पाठीमागे मिक्सर मशीन जोडले होते.महामार्गालगत वाठार येथे सकाळी अजून एक काँक्रीटचे काम असल्याने पाठीमागील मिक्सर मशीन सोडवून ते लावण्यासाठी सर्वजण खाली उतरले.हे मशीन सोडवून लावत असतानाच कोल्हापूरकडून भरधाव वेगाने एम एच १२ एल टी ७०९५ ट्रकने या सर्व मजुरांना क्षणार्धात उडविले.यात सचिन धनवडे (रा.भादोले) हा जागीच ठार झाला.तर अकरा गंभीर जखमी झाले.यात दोन महिलांचा समावेश आहे.या सर्व जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.