खा.धैर्यशील मानेंना पुन्हा लोकसभेत
पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ‘फिल्डिंग’
मतदारांशी ‘दुवा’ साधण्याचा प्रयत्नः मतदारसंघात मोठा राबता वाढविला
जयसिंगपूर / अजित पवार
लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्या क्षणी वाजण्याची शक्यता आहे.यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विविध कामांच्या शुभारंभाचा धडाका लावला आहे.खासदार माने यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लोकसभेत पाठवायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे.यासाठी ‘फिल्डिंग’ टाईट लावली आहे.महिला दिनाचे औचित्य साधत मतदार संघात राबता वाढविला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात तीन व सांगली जिल्ह्यात एक कार्यक्रम घेऊन त्यांनी मतदारांशी ‘दुवा’ साधण्याचा प्रयत्न केला आहे.
हातकलंगले लोकसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा इचलकरंजी मतदारसंघ या नावाने परिचित होता.या मतदारसंघावर खासदार माने यांच्या आजोबा खा.स्व. बाळासाहेब माने यांनी बर्याच वेळा प्रतिनिधित्व केले. यामुळे या मतदारसंघावर कॉंग्रेसचे प्राबल्य होते.यानंतर निवेदिता माने वहिनी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रतिनिधित्व केले.पण कालांतराने या मतदारसंघात त माजी खासदार राजू शेट्टी यांनी दोन वेळा आपल्या मत आजमावून लोकसभेत शेतकर्यांचा कैवारी असा लौकिक मिळवला होता.पण बदललेल्या समीकरणात धैर्यशील माने यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून या मतदारसंघावर आपला दावा ठोकला. पण सध्या राज्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झाले आहे यामुळे धैर्यशील माने यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लोकसभेत पाठविण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.
नुकताच कोरोची (ता. हातकलंगले) येथे झालेल्या कार्यक्रमात तयारीसाठी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या मुलाखती दरम्यान धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यावर घनाघात केला आहे.माने म्हणाले, माजी खास.राजू शेट्टी यांना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सलगी करायची आहे.पण त्यांच्याजवळ सोबतीला शरद पवार असल्याकारणाने तुम्ही मला तिकीट द्या असे त्यांचे म्हणणे आहे.परंतु ठाकरे यांना शेट्टीना डावलायचेही नाही. असाही त्यांचा होरा आहे.या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासोबत आपण गेलो तर आपल्याला अडचणी निर्माण होतात असा राजू शेट्टी यांचा डाव असल्याचे खासदार माने यांनी बोलून दाखवले.
हातकणंगले नगरपंचायत येथे खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार्या शिवराज्य भवन या बहुउद्देशीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या दुवा या चिमुकलीचा पहिला वाढदिवस जागतिक महिला दिनी हातकणंगले येथे झालेल्या ’शिवराज्य भवन’ कोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडन मधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे, त्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे.राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एैतिहासिक माणगाव परिषद माणगाव येथेच झाली होती.या दोघांचे संयुक्त स्मारक येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी १९९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.माणगाव येथील माणगाव परिषदेच्या १५ ठरावांच्या शिलालेखाचे उद्घाटन, होलाग्राफिक शो व माणगाव येथे साकारलेल्या लंडन हाऊस प्रतिकृती इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला.
तसेच हातकलंगले मतदारसंघातील आणि सांगली जिल्ह्यातील उरण इस्लामपूर या नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेतून प्रस्तावित केलेल्या नगरपालिका हद्दीतील भाजी मंडई व शॉपिंग सेंटर बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन व कोणशीला समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हातकलंगले लोकसभा मतदारसंघावर आपली मेहरनजर असल्याचे दाखवून दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील माने यांना पुन्हा लोकसभेत पाठवायचे यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
चौकट
शासकीय कार्यक्रमातून प्रचार
हातकलंगले लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आणि सांगली जिल्ह्यातील दोन तालुके येतात. या मतदारसंघातील शासकीय कामांचा शुभारंभ नाम. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. पण हे सर्व कार्यक्रम शासकीय असले तरी एकंदरीतच या कार्यक्रमाला प्रचाराची झालर असल्याचे दिसून येत होते.