टेंडर प्रक्रिया रद्दच्या निषेधार्थ बुधवारी कुरुंदवाड बंदची हाक

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय यात्रा कमिटीतर्फे कृष्ण वेणीची समांतर यात्रा दिलीप घोरपडे यांच्या शेतात भरवण्याचा अखेर निर्णय घेण्यात आला.प्रशासक आशिष चौहान यांनी पाळणा जागा वाटपाची टेंडर प्रक्रिया रद्द न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

 

प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी यात्रेतीलखेळणा-पाळण्यासाठी एकाच एजंटला जागा देण्यासाठी टेंडरप्रक्रिया राबवून अडीच एकर जागा एकाच्याच घशात घालून जागेचा घोडेबाजार केल्याचा आरोप केला होता.या घोडेबाजारामुळे खेळण्या-पाळण्याचे दर वाढणार आणि यात्रेकरूंना हे दर परवडणार नाही.

 

 

म्हणून ही प्रक्रिया रद्द करून सर्वच पाळणेवाल्यांना लकी ड्रॉ पद्धतीने जागा देण्याचा निर्णय मंगळवार सायंकाळ पर्यंत द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय यात्रा कमिटीतर्फे करत तसे न झाल्यास शिवतीर्थाजवळ दिलीप घोरपडे यांच्या शेतात समांतर यात्रा भरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा दिला होता.

 

प्रशासक चौहान यांचा कोणताच निर्णय न आल्याने कमिटीतर्फे समांतर यात्रा भरवण्याचा निर्णय घेऊन पाळणा व्यावसायिक हुसेन कन्नूरे,शहीद बारगीर,सुग्रा मुजावर यांना निमंत्रित करून समांतर यात्रेमध्ये पाळण्यासाठी जागा देण्यात येईल पाळण्याचे दर कमीत कमी असावेत अशी सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे,राजू आवळे,बाबासाहेब सावगावे,दयानंद मालवेकर,अनुप मधाळे,तानाजी आलासे,सुनील कुरुंदवाडे,बबलू पवार यांनी ठेवली.

 

 

पाळणा व्यावसायिकांनी 50 रुपयाच्या आत दर ठेवण्याची ग्वाही देत इतर व्यावसायिक 50 रुपये दर घेत असतील तर प्रतिस्पर्धी दर म्हणून आणखीन 10 रुपये कमीने दर घेऊ अशी ग्वाही दिली.बुधवारी शहर बंदची हाक देत रॅलीने सकाळी 10 वाजता शहरातून घोरपडे यांच्या शेतात जाऊन श्रीफळ वाढवुन शुभारंभ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

 

यावेळी संजय डोंगरे,धम्मपाल ढाले,प्रवीण खबाले,रघु नाईक,सिकंदर सारवान,आयुब पट्टेकरी,दिलीप बंडगर, महावीर आवळे,जितेंद्र साळुंखे,गौतम एकाटे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!