जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह राणा यांना डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील समाजभूषण पुरस्कार
भास्करराव पेरे – पाटील यांना समाजकार्य तर पै अमृता पुजारी हिला युवाप्रेरणा पुरस्कार जाहीर
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांनी शिरोळ तालुका व परिसरात शेतकरी सहकारी संस्थांच्या माध्यमातून समृद्धीची आणि संपन्नतेची बीजे रोवली डॉ सा रे पाटील यांनी आयुष्यातील ६० वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात अतुलनीय काम केले त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीला कळावा यासाठीच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ. त्यांच्या नावे यावर्षीचा देण्यात येणारा डॉ. अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजभूषण पुरस्कार जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा तर समाजकार्य पुरस्कार भास्करराव पेरे पाटील यांना आणि युवा प्रेरणा पुरस्कार पैलवान अमृता पुजारी हिला देण्यात येणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा १ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर होणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना विनोद शिरसाठ पुढे म्हणाले राज्याचे शिल्पकार स्व.यशवंतरावजी चव्हाण यांनी समृध्द आणि संपन्न महाराष्ट्राच्या उभारणीकरता सहकार-कृषी औद्योगिक समाज रचनेचे स्वप्न पाहिले.त्यांच्या याच स्वप्नांचा ध्यास घेवून,त्या पिढीतील कर्तृत्वसंपन्न सहकारमहर्षी श्री दत्त उद्योग समुहाचे शिल्पकार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी शिरोळ तालुका आणि परिसरात शेतकरी सहकारी संस्थाच्या माध्यमातून समृध्दीची आणि संपन्नतेची बीजे रोवली.या सहकारी संस्थामुळेच शिरोळ तालुका आणि परिसराची आज देशभरात समृध्दी व संपन्नतेची बेटे अशी ओळख निर्माण झाली आहे.स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील हे आपल्या आयुष्यातील सन १९५० ते २०१५ असा ६० वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जिवनात वावरले.महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आणि श्री दत्त कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी दिर्घकाळ काम केले.परिसरात अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये व त्या यशस्वीरित्या चालविण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला. जयप्रकाश नारायण,साने गुरुजी,एस.एम.जोशी व अच्युतराव पटवर्धन यासारख्यांचा सहवास लाभल्याने आयुष्यभर एक ध्येयवाद समोर ठेवून नितीमुल्यांची जपणूक करत शेवटपर्यंत कार्यरत राहिले.दि.१ एप्रिल २०१५ रोजी डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांचे निधन झाले.त्याच वर्षापासून त्यांच्या नांवाने समाजभूषण पुरस्कार देण्यास दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्र परिवारकडून ४ वर्षे पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील फौडेंशन यांच्या वतीने पुरस्कार देण्यास सुरुवात केली.व्यावसायिक नितीमुल्यांचा अंगिकार करीत,ध्येयवादी पध्दतीने काम करणा-या सहकार,शेती,शिक्षण,समाजकार्य किंवा उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी पहिला पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी नेते स्व.एन.डी.पाटील यांना तर दुसरा पुरस्कार स्व. आमदार गणपतराव देशमुख यांना तिसरा पुरस्कार जेष्ठ तत्वनिष्ठ राजकारणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.बी.जे.खताळ पाटील यांना तर चौथा पुरस्कार त्रिपुराचे माजी राज्यपाल शिक्षण तज्ञ,पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील यांना तर पाचवा पुरस्कार चेतना गाला-सिन्हा यांना,सहावा पुरस्कार कृषी क्षेत्रातील तज्ञ अशोक बंग यांना,सातवा पुरस्कार देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांना, आठवा पुरस्कार भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी मिरा बोरवणकर विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.गत वर्षापासून डॉ अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजकार्य आणि डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील युवा प्रेरणा पुरस्कार असे आणखी दोन पुरस्कार देण्यास सुरू केले आहेत.यामध्ये समाजकार्य पुरस्कार डॉ.सुधिर भोंगळे यांना, तर युवा प्रेरणा पुरस्कार राही सरनोबत यांना प्रदान करण्यात आला होता.या वर्षी पुरस्कार निवड समितीने डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजभुषण पुरस्कार जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा यांना देण्याचे ठरविले आहे.शिवाय या वर्षीचा स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजकार्य पुरस्कार ग्राम विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांना देण्याचे ठरविले आहे.तर कोल्हापूर जिल्ह्याच्या नाव लौकीकात उत्तुंग कामगिरी करून भर घालणाऱ्या,कुस्ती या खेळात राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करत असलेल्या आपल्या शिरोळची कन्या महिला महाराष्ट्र केसरी पै अमृता पुजारी हिला स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील युवाप्रेरणा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे असेही शेवटी त्यांनी सांगितले.श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील म्हणाले की पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तोलामोलाची मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतात शिरोळ तालुक्याच्या प्रगतीसाठी नेहमीच डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील फौडेंशन प्रयत्नशील राहील.यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,संचालक शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागी, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, जयसिंगपूरचे उद्योगपती अशोकराव कोळेकर, दिलीप पाटील – कोथळीकर,हसन देसाई,माजी सभापती मिनाज जमादार,नृसिंहवाडीचे माजी उपसरपंच अनंत धनवडे, प्रा मोहन पाटील, युनूस जमादार, दत्त कारखान्याचे सेक्रेटरी अशोक शिंदे, जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादासो काळे, दत्त ग्राहक भांडारचे व्यवस्थापक सदानंद घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत श्री दत्त ग्राहक भांडारचे दामोदर सुतार यांनी केले.
चौकट
राष्ट्रीय जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह राणा यांचे पाण्याविषयी केलेले कार्य आजच्या युवा पिढीला कळावे यासाठी त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.तसेच ग्राम विकासासाठी भास्करराव पेरे पाटील यांनी केलेले काम अतुलनीय आहे.त्यांच्याही कार्याची माहिती युवा वर्गाला व्हावी यासाठी या दोन्हीही मान्यवर व्यक्तींची मुलाखत मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज येथे घेण्यात येणार आहे.याचाही लाभ घ्यावा असे आवाहन विनोद शिरसाठ यांनी केले.