जुने दानवाड / प्रतिनिधी
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाची गरज असल्याचे सुरेंद्र राजेशिर्के यांनी सांगितले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषि महाविद्यालय,जैनापुर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनीनी ग्रामीण कृषि जागरूकता,कृषी कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक कार्यक्रमा अंतर्गत जुने दानवाडमध्ये ग्रामपंचायत आवारात चर्चासत्राचे आयोजन केले होते.या चर्चासत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर येथील राष्ट्रीय केमिकल्स ॲड फर्टीलायझरचे उपव्यवस्थापक सुरेंद्र राजेशिर्के उपस्थित होते.
महाराष्ट्रात भारी काळ्या जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सुपीक जमिनी क्षारपड होत आहेत.ही समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या समस्येमुळे शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन हेक्टरी ५० ते ६० टनांपर्यंत कमी झालेले आहे. क्षारपड व पाणथळ जमिनीची सुधारणा करण्यासाठी भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत, रासायनिक व सेंद्रिय भूसुधारकांचा वापर, पिकांची फेरपालट व निवड आणि जमिनीचे अचूक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे तसेच रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षण करून द्यावी असे सुरेंद्र राजेशिर्के यांनी यावेळी सांगितले. उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती राजश्री तासगावे होत्या. उपसरपंच प्रवीण वडगावे आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कृषिकन्या तेजस्विनी खोले, रसिका पाटील, ऋतिका पाटील, योगिता पुजारी, तेजस्विनी रजपूत, सोनाली रोकडे उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.शरद पाटील, उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. संजय फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रीती आवळे, विशेषज्ञ डॉ. सारिका कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.