कुरुंदवाड / प्रतिनिधी
औरवाड ता.शिरोळ येथील राजीव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत 4 कोटी 58 लाख 74 हजार 367 रुपयाचा अपहार केले प्रकरणी चेअरमन,व्हाईस चेअरमन, कॅशीयरसह सर्व संचालक, सेक्रेटरी आणि सोनार अशा 15 जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहकारी संस्था जयसिंगपूर-शिरोळचे लेखापरीक्षक संभाजी प्रतापराव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चेअरमन प्रतापराव आप्पाराव आगरे, व्हा.चेअरमन श्रीमती शिला रमेश पटटणशेटी,कॅशीयर महावीर श्रीपाल मगदूम,सेक्रेटरी श्रीकांत बाळासाहेब हिंगणगावे,संचालक नारायण रावसो गावडे, विजय चंद्रकांत दुग्गे,शैलेंद्र प्रतापराव आगरे,बापुसो बंडु कोले,भगवान बाबु गोंधळी,अब्दुलरशीद मोहद्दीन चौगुले,चंद्रकांत लक्ष्मण कांबळे आणि सोनार जयवंत यशवंत महामनी तर मयत तीन संचालक (सर्व रा. औरवाड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संचालक शैलेंद्र प्रतापराव आगरे,सेक्रेटरी श्रीकांत बाळासाहेब हिंगणगावे,आणि सराफ जयवंत यशवंत महामनी(तिघे.रा.औरवाड)यांना शुक्रवारी पहाटेबअटक करून जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.15 जणांतील सुकुमार बाबुराव आगरे,धनेश आप्पा कोले, विजयमाला गुंडाप्पा कोळी हे तीन संचालक मयत आहेत.9 जणांच्या शोधासाठी पोलिसांनी कर्नाटक राज्यात पथक रवाना करण्यात आले.
औरवाड येथील राजीव पतसंस्थेत एप्रिल 2016 सालापासून ते मार्च 2022 सालापर्यंत बनावट कागदपत्रके तयार करून कर्जदारांच्या नावे 1कोटी, 74 लाख, 88 हजार 371 रुपयाचे सोने तारण कर्ज दाखवले आहे.ठेव पावती तारण न घेता 1 कोटी 2 लाख,
77 हजार 48 रुपयाचा तर तारण,कॅश क्रेडीट कर्ज 1 कोटी, 56 लाख, 8 हजार,948 तर शिल्लक 25 लाख रुपये अशा एकूण 4कोटी,58 लाख,74 हजार, 367 रुपयाच्या रकमेचा अपहार केल्याचे डिसेंबर 2023 साली झालेल्या लेखापरीक्षणात उघडकीस आले.
शुक्रवारी पहाटे बी-पार्ट मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित
अपहारप्रकरणी गेल्या अनेक महिन्यापासून गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने आंदोलन अंकुश संघटना,ठेवीदार आणि पीडित सभासदांनी आपल्या मुलाबाळासह गुरुवारी सकाळी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून संचालक मंडळ आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी ठिय्या मारला होता.गुरुवारी रात्रभर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पीडितांच्या महिलांनी तहसीलदार कार्यालयात चूल पेटवून झुणका-भाकरी करून रात्रभर आंदोलन सुरू ठेवले होते. शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्याचा बी-पार्ट सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांनी आंदोलकांना दिल्यानंतर पहाटे आंदोलन स्थगित करण्यात आले.