माझी गोड मैञीण!
एखाद्या उत्तम कवितेच्या बाबतीत कसं होतं, जी कविता अगदी आपल्या मनाच्या आतलं..हृदयाच्या जवळचं जी व्यक्त करते ती आपल्याला आपलीशी वाटते.मनापासून आवडते.
तसंच माणसांच्या बाबतीतही होतं माझं. जी माणसे विचाराने अगदी सेम माझ्यासारखी असतात, ती आपोआप मला प्रिय होऊन जातात..मनामध्ये घर करून बसतात..शुभाच्या बाबतीत अगदी असंच झालंय!
आयुष्यातील अतिप्रिय गोष्ट म्हणजे स्वाभिमान… जागृत आत्मसन्मान … आणि त्यांना जपण्यासाठी किंमत चुकवावी लागते.. लागणार याचं आत्मभान… त्यासाठी वाट्टेल ती किंमत चुकवण्याची तयारी… न डगमगता परिणाम स्वीकारून जिद्दीने सस्मित चेहऱ्याने नवा मार्ग धुंडाळणे..आव्हानांवर मात करत आपली अपुरी स्वप्नं पूर्ण करणे…स्वतःचं नवं अस्तित्व स्वबळावर निर्माण करणे…हे सगळं पुस्तकी वाटतं ना? पण नाही, हे सगळं म्हणजे आमची शुभा!
पहिल्या काही भेटींमध्येच हे लक्षात आलं, तेव्हा जाणवलं की अरे ही डिट्टो माझ्यासारखी आहे!आणि मग आतून कुठूनतरी प्रेम पाझरत आलं.. काळीजमाया उफाळून आली… आणि आतल्या आवाजाने सांगितलं , हे जपलं पाहिजे. कित्येकांसाठी जिवंत उदाहरण आहे हे जगणं! हा निर्धार कुठल्याच परिस्थितीत, कोणत्याच कारणास्तव मोडून जाता नाही कामा. आणि मी केव्हा तिला मायेच्या कवेत घेतलं, कळलंही नाही.
अर्थात हे सगळं हिमनगाचं एक टोक होतं. प्रौढ वयातले आपण सगळे!स्वभाव, व्यक्तिमत्व, विचार, तत्व, भावना, रागलोभ सगळंच टोकदार होऊन गेलेलं असतं तोवर. कितीतरी कंगोरे, कितीतरी टोकं आलेली असतात अस्तित्वाला. वाट्याला आलेले अनुभव,भोगलेली दुःख, मनस्ताप यामुळे कडवटपणा आलेला असतो, नकारातत्मकता भरून जाते जगण्यात,अविश्वास मन व्यापून टाकतो…स्वाभाविकच मग व्यक्तिमत्वांचे हे स्पाईक्स एकमेकांना खुपतात.. दुखवतात… रडवतात. समजून घेता घेता आणि दुखऱ्या सलांवर मात करून पुढे जाता जाता अक्षरश: जीव जातो. घुसमट होते, चिडचिड होते, संताप होतो आणि मन विव्हळ तर होतंच होतं. पण या सगळ्यांतून तावून सुलाखून जे टिकतं, ते नातं सच्चं असतं…अक्षय आनंद देतं… अभंग सोबत देतं..शुभाच्या बाबतीत हेच सगळं झालंय!
पहिलं एक वर्ष या सगळ्यांतच गेलं. पण समज गैरसमज, रागलोभ, चिडचिड या सगळ्यांच्या पार जाऊन मनाला व्यापून उरलं, ते निखळ, निर्मळ मैत्र. दोन्ही बाजूनी लागलेला जीव आणि आपुलकीचे घट्ट बंध!
साहित्यावरचं प्रेम,चांगलं वाचन, उत्तम समज, चांगला लिहिता हात, कमीत कमी गरजा ,सुखासीनतेची नावड, काहीतरी देऊन जाणाऱ्या सिनेमा नाटकांत रूची , कॉटन साड्यांवरचं प्रेम , मंद आवाजात अर्थपूर्ण गाणी -गझल्स ऐकणं, झाडांवरचं प्रेम, स्वच्छता -टापटीपपणाची आवड, अंगी मुरलेली काटकसर, नियोजनबद्धता, सतत काहीतरी करत राहण्याची वृत्ती, व्यायामाची आवड असे आमच्यातले कितीतरी समान धागे सापडत गेले, पाहतापाहता आमच्यातल्या एकमेकांना त्रासदायक वाटणाऱ्या काही वेगळ्या गोष्टी, मतभेद, रुसवेफुगवे, रडारड यांवर ते वरचढ ठरत गेले आणि प्रत्येक टप्प्यावर आमचं मैत्र बळकट होत गेलं.
याच प्रवासात एक टप्पा असा आला, की तशी माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली ही माझी मैत्रिण माझी मुलगीच होऊन गेली. तिच्याबाजूनेही तेवढाच जीव लावला गेला, तेवढीच माया मिळाली आणि दोन घरं घट्ट जोडली गेली. नियतीने श्रद्धा आणि शुभा अशा 2 पोरी आम्हाला दिल्यात .त्यांच्यावर माया करताना, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहताना, त्यांची साथ देताना आम्हाला अतुलनीय आनंद मिळतो.
“आम्ही पालक आहोत ना, मग गप्प बसायचं…”असा दम अमित आणि मी या दोघींना देत राहतो आणि त्याही निमूट आमचा मायेचा अधिकार मान्य करतात.
असं हे आमचं अनोखं नातं!
समजण्या-उमजण्याचा प्रवास तर निरंतर चालूच राहील पण प्रत्येक टप्प्यावर हे नातं बहरत राहील, याचा विश्वास आहे आम्हा सगळ्यांनाच!पहिल्या भेटीत काहीशी शिष्ट, अबोल वाटणारी ही माझी मैत्रिण लहान मुलांत मात्र सहज रमते, त्यांच्याशी मस्ती करते, अगदी मुलात मूल होऊन जाते… एकीकडे मोजकं बोलणारी, पदरी पडलेल्या अनुभवांनी कुणाच्याही जवळ जायला, जीव लावायला घाबरणारी पण एकदा आपलंसं केल्यावर मायेचा वर्षाव करणारी… उत्तम सुगरण आणि स्वयंपाकाची अतोनात आवड असणारी… कोणत्याही वेळी गेलं तर तत्परतेने काही ना काहीतरी खाऊ घालणारीच …कधी अनाकलनीय वाटणारी तर पुढच्याच क्षणाला जणू जन्मोजन्मीची ओळख असल्याचा फील देणारी…
असं म्हणतात, ज्या माणसाच्या घराचं दार आपण कधीही, कुठल्याही वेळी विश्वासाने ठोठावू शकतो आणि “भूक लागलीय,”असं न संकोचता सांगू शकतो, ती खऱ्या अर्थाने आपली माणसं असतात!”शुभाच्या रूपाने असं घर आम्हाला गवसलं आहे. आमच्या प्रचेतससाठी तर तिचं घर म्हणजे त्याचं सेकंड होमच आहे ! कधीही अडचणीच्या वेळी तिला साद घालावी… तिच्याकडून तत्परतेने मदत मिळणारच,याची खात्री आम्हा तिघांनाही असते!
अशी ही माझी गोड मैत्रिण!तिला निरोगी दीर्घायुष्य लाभो…यापुढील काळात तिच्या आयुष्यात भरभरून सुख, आनंद येवो आणि त्या लाटेत सगळी दुः खं, वंचना, वेदना, नकारात्मकता वाहून जावो…मनाच्या कोपऱ्यात लपून राहिलेला कडवटपणा, संशय, भीती नष्ट होवो आणि नव्या उत्साहाने, उमेदीने सकारात्मकतेने ती जगण्याला सामोरी जावो… याच मनापासून शुभेच्छा .
डॉ.अदिती काळमेख