नृसिंहवाडी / प्रतिनिधी
निरव शांततेतील दत्त मंदिराचा परिसर, सोबत कृष्णा नदीचा संथ प्रवाह आणि कृष्णावेणी मातेच्या नयनरम्य मूर्तीसमोर सुप्रसिद्ध बासरी वादक पं. रूपक कुलकर्णी यांच्या सुमधुर वेणूवादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. सुमारे दोन तास चाललेली ही संगीत मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतशैलीत बासरीचे वादन पं. कुलकर्णी यांनी केले. यावेळी त्यांची शिष्यवृंदा सोबत सुरू असलेली सांगीतिक जुगलबंदी श्रोत्यांचे खास आकर्षण ठरली.
कृष्णावेणी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी कीर्तनाचे सत्र झाल्यानंतर रात्रीच्या सत्रात हा कार्यक्रम पार पडला. पं. रूपक कुलकर्णी हे पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य असल्याने त्यांच्या बासरी वादनात रसिक तल्लीन झाले असल्याचे शरद घाग यांनी सांगितले. बासरीसाठी प्रसन्नराज जोशी (रत्नागिरी), आदित्य सुतार (सांगली), तनय कामत (कोल्हापूर) यांनी साथसंगत केली. ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम प्रसाद पाध्ये यांचे तबला वादन व प्रथमेश तारळकर यांचे पखवाज वादन रसिकांसाठी पर्वणी ठरली. पं. रूपक कुलकर्णी व सहकाऱ्यांचा कृष्णावेणी उत्सव मंडळातर्फे प्रतिमा व श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
दत्त मंदिरात कृष्णावेणी उत्सवावेळी वादनाची सेवा मिळाल्याने आनंद वाटला, अशा भावना पं. रूपक कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या समारोपावेळी ‘पार्वतीनंदन गजानना..’ या भक्तीगीताचे वादन बासरीतून करण्यात आले. फेसबुकद्वारे कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने घरबसल्या अनेकांना या मैफिलीचा लाभ घेता आला.