ग्राहक देवो भव ! ही जाणीव पदोपदी मनात कायम ठेवून भुकेल्या जीवास कोणत्याही क्षणी माफक दरात अगदी घरच्या चवीचे शुध्द शाकाहारी जेवण पुरवून खरीखुरी मानवसेवा जपणारी सर्वांचे अगदी हक्काने असणाऱ्या हाॅटेल नार्वेकरची १३ फेब्रुवारी रोजी चार वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण झाली.आर्थिक व्यवहारा पलिकडे जाऊन केवळ माणुसकीच्या भावनेतून सर्वांना चांगली भोजन सेवा द्यायची ,याच शुध्द भावनेने सौ.नंदा संभाजी नार्वेकर यांनी आपल्या कुटूंबियांच्या मदतीने वस्ञनगरीतील लिंबू चौक परिसरात हाॅटेल नार्वेकरच्या माध्यमातून
घरच्या चवीचे अख्खा मसुर , पनीर भाजी , मिक्स भाजी , चपाती यासह विविध पदार्थ
असलेल्या स्वादिष्ट जेवणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे.त्यामुळे अगदी सर्वसामान्य वर्गाला देखील आर्थिकदृष्ट्या परवडणारे चांगल्या दर्जाचे जेवण मिळणे शक्य झाले आहे.याचेच फलित म्हणजे त्यांचा हा हाॅटेल व्यवसाय आता यशाचा एक एक टप्पा पार करत आहे.तर दुसरीकडे या व्यवसायातून आर्थिक स्थैर्य प्राप्त होत चालले असून सौ.नंदा नार्वेकर यांनी या हाॅटेलच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक कमाईवरच आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.त्यांचा
मोठा मुलगा दिगंबर हा हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करुन परदेशात मालदीव येथे यशस्वी करिअरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले अनुभव कौशल्य पणाला लावत आहे.तर लहान मुलगी मयुरी ही पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहे.त्यामुळे त्यांची प्रतिकूल परिस्थितीवर
मोठ्या जिद्दीने व कष्टाच्या जोरावर
मात करुन महिला ही अबला नसून सबला हे सिद्ध करुन दाखवतानाच कोणतेच काम हलके नसून ते प्रामाणिक सेवाभावी वृत्तीने केल्यास यशाला गवसणी घालता येते ,याचे आदर्श उदाहरण आहे.त्यांचा यापूर्वीचा जीवन प्रवास हा खूपच संघर्षमय आणि मनाला थक्क करणारा
आहे.कधी गावोगावी जाऊन
बाजारात पालेभाजी विकायची , पडेल ती कामे करायची , घरगुती खानावळ चालवायची आणि त्यातून होणा-या आर्थिक कमाईवरच आपल्या कुटूंबाला हातभार लावत,मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करायचे आणि स्वतःचे अस्तित्वही सिद्ध करायची म्हणजे मोठे कडवे आव्हान होते पण ते त्यांनी मोठ्या त्यागातून ,जिद्दीतून लिलया पेलले आहे.म्हणूनच त्यांच्या संघर्षमय यशाचे वेगळेपण हे अनेकांना निश्चितच प्रेरणा देणारे आहे,यात तिळमात्र शंका नाही.एकंदरीत,नार्वेकर कुटूंबाची प्रामाणिक कष्टाची चार वर्षांची यशस्वी धडपडीची वाटचाल १३ फेब्रुवारीला पूर्ण झाली असून हे सेवाव्रत यापुढेही असेच सेवाभावी वृत्तीने सुरु राहणार आहे.त्यांच्या या ग्राहक देवो भवच्या प्रामाणिक धडपडीला शुभेच्छारुपी सलाम आणि पुढील
दमदार वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा !