अवजड वाहतुक व सतत वर्दळीच्या मार्गावर गतिरोधक बसवावा

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

नृसिंहवाडी – शिरोळ या प्रमुख मार्गावरील औरवाड फाट्यावर गतिरोधक व पांढरे पट्टे असणे गरजेचे आहे. या ठिकाणी सतत अनेक छोटे-मोठे अपघात होत असून सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर

 

करतात. ऊस वाहतूकदारांकडून बेजबाबदारपणे वाहने वेगात चालवली जातात.अशा अक्षम्य चुकांमुळे ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरला धक्का लागून जाकीर पटेल या निवृत शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

 

हा चौक अवजड वाहतुकीमुळे सतत वर्दळीचा असल्याने या मार्गावर गतिरोधक बसवावा व पांढरे पट्टे मारावेत, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.नृसिंहवाडी दत्त मंदिराकडे जाण्यास मार्ग विचारणा करण्यासाठी चारचाकी वाहनधारक मुख्य मार्गावरच थांबतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

 

जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाडकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पिकअप निवारा शेड रस्त्यालगतच आहे. दोन्ही बाजूंनी येणारी वाहने भरधाव वेगात असतात.‌ त्यामुळे या शेडमध्ये जीव मुठीत घेऊन प्रवाशांना थांबावे लागते. या रस्त्यावर शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी असते.

 

सलगरे-पाचवा मैल या राज्यमार्गाचे रूंदीकरण झाल्याने वाहने सुसाट वेगात चालवली जातात.रात्रीच्या वेळेस या मार्गावर जाण्यासही स्थानिक धजावत नाहीत. त्यामुळे रेडियम रिफ्लेक्टर लाईट देखील बसवणे गरजेचे आहे. यापुढे एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

 

शिरोळ पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी देऊनही या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एखादा पोलीस येत नाही, अशी येथील नागरिकांची तक्रार आहे.

चौकट

नृसिंहवाडी दत्त मंदिराचे गुगल लोकेशन औरवाडच्या दिशेने दाखवले जाते.त्यामुळे शिरोळहून येणारे प्रवासी गोंधळून मुख्य कमानीकडे न येता औरवाडकडे जातात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो.गुगल लोकेशन बदलण्यासोबतच ठळक अक्षरात दिशादर्शक फलक लावायला हवेत.

 

नागपूर-गोवा हा शक्तीपीठ महामार्ग या मार्गावरून जाणार असल्याची घोषणा झाली आहे.यामुळे काही प्रश्न निकाली निघणार असल्याची जरी अपेक्षा असली तरी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!