अवघ्या ४७२ रुपयांत मिळणार ३० लाख रुपयांचा अपघाती विमा सुरक्षा

Spread the love

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे खातेदार असलेल्या सर्वच पगारदार-नोकरदारांना बँकेने ३० लाख रुपयांची अपघाती विमा सुरक्षा योजना लागू केली आहे. राष्ट्रीयकृत कंपनी असलेल्या न्यू इंडिया ऍशूरन्स कंपनीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या सहयोगातून पुणेच्या ईमेड लाईफ इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विस या कंपनीच्या माध्यमातून बँकेने अवघ्या ४७२ रुपयांच्या हप्त्यात ही योजना सुरु केली आहे.पगारदार नोकरदारांच्या संमतीने वर्ग केलेल्या विमा हप्त्याच्या रक्कमेचा धनादेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कंपनीकडे देण्यात आला.कंपनीचे अधिकारी अमर जंगम आणि राहुल चतुर्वेदी यांनी हा धनादेश स्वीकारला. कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही संमतीपत्र न दिलेल्या उर्वरित नोकरदारांनी ते पगार घेत असलेल्या संबंधित शाखांशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरण्याचे आवाहन बँक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे बचत खाती असलेल्या विविध नोकरदार आणि पगारदार संघटनांनी बँकेकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात अशा विमा सुरक्षा योजनेची मागणी केली होती.त्या मागणीचा विचार करीत बँकेने २० हजार पगारदारांच्या सुरक्षेसाठी ही योजना सुरू केली आहे.शासकीय, निमशासकीय नोकरदार,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बँकेचे सर्व सेवक,जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी, साखर कारखान्याचे कामगार, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, विकास सेवा संस्था, दूध संस्था व पतसंस्था यांचा समावेश आहे. विमा हप्ता भरल्यापासून एक वर्ष या विमा सुरक्षा कवच याची मुदत आहे.

यावेळी आमदार राजेश पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, संचालक सुधीर देसाई, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

या योजनेत समाविष्ट विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अगर कायमचे अपंगत्व आल्यास ३० लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. विमाधारकाचे दोन हात किंवा दोन डोळे किंवा दोन पाय कायमचे निकामी होऊन अपंगत्व आल्यास शंभर टक्के सुरक्षा मिळणार आहे. एक अवयव निकामी झाल्यास अगर ५० टक्के अपंगत्व आल्यास १५ लाख रुपये विमा भरपाई मिळणार आहे. अवघ्या ४७२ रुपयांच्या हप्त्यामध्ये बँक आणि विमा कंपनीने नोकरदार पगारदारांची ही जोखीम घेतलेली आहे.

error: Content is protected !!