शेतकऱ्यांची दराबाबतीत होणारी पिळवणूक थांबणार कधी?

Spread the love
सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम
चिकोडी – निपाणी तालुक्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन 3100 / रुपये पहिली उचल द्यावी.झोपेचे सोंग घेऊन तीन हजारने उसाची जुलमी उचल बंद करावी.तसेच शेतकऱ्यांची दराबाबतीत होणारी पिळवणूक थांबवावी.अशी मागणी केली जात आहे.बळीराजाची मात्र ३१००/ रू दरासाठी घालमेल सुरू आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील चिकोडी व निपाणी तालुक्यातील अनेक साखर कारखान्यांनी उसाच्या दराबाबत अजूनही शेतकरी हिताचे धोरण अवलंबिलेले दिसत नाही.कर्नाटकातील अनेक साखर कारखाने 3 हजारच्या पुढे उचल देण्यास तयार नाहीत.यामुळे शेजारील राज्यात असणाऱ्या उसाचा दर व कर्नाटकातील असणाऱ्या उसाचा दर यामध्ये सर्वसाधारणपणे तीनशे ते साडेतीनशे रुपये फरक दिसून येत आहे.हा फरक सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे .कर्नाटक सरकार हे साखर कारखानदारांचे पाठीराखे आहे का? शेतकऱ्यांच्या उसाच्या दराबाबतचे योग्य व हिताचे निर्णय का घेतला जात नाही ? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.निपाणी तालुक्यातील एका साखर कारखान्याने सुरुवातीला तीन हजार रुपये देऊन एक डिसेंबर पासून 3100/  रुपये दर जाहीर केला आहे.कारखान्याच्या सुरुवातीला ज्यांनी ऊस पाठवला त्यांना मात्र तीन हजार रुपये हा अन्याय कसला? प्रारंभी ऊस पाठवणाऱ्यांना 3 हजार रू प्रमाणे बिल निघाले असून हे योग्य दिसत नाही.तरी सर्वच ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 3 हजार 100 रुपये दर मिळावेत अशी रास्त मागणी या कारखान्याकडे ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांनी करावी.असे मत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण झाले आहे. संबंधित साखर कारखान्याने या शेतकरी हिताचा विचार करावा आणि कारखाना सुरू झाल्यापासून ऊस पाठवणाऱ्या सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3 हजार 100रू प्रमाणे बिल काढावे व शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.एकूणच काय कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमा भागात उसाच्या दराबाबत कोणतीही एक वाक्यता दिसून येत नाही, यामुळे सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी अत्यंत नाराज असून ऊसाला कर्नाटक व महाराष्ट्रात सर्वत्र सारखा दर असावा आणि शेतकऱ्यांचे हित जोपासावे.हा विचार जनसामान्यात प्रकर्षाने चर्चिला जात आहे.
error: Content is protected !!