चिकोडी तालुक्यातील सदलगा हे शहर अंदाजे 35 ते 40 हजार लोकवस्तीचे शहर आहे या ठिकाणी नगरपालिका असून या नगरपालिकेने आतापर्यंत सदलगा शहरातील स्मशानभूमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून तेथे कोणत्याही प्रकारची मूलभूत
सुविधा लोकांना नाही.अंतिम संस्कारसाठी आलेल्या जनतेला बसण्यास निवारा नाही,शव दहन करण्याकरिता शव दाहिन्या व्यवस्थित नाहीत,पाण्याची सोय नाही, दिवाबत्तीची सोय नाही या मूलभूत गरजा देखील त्या ठिकाणी अस्तित्वात नाहीत,
म्हणजेच काय एकंदरीत नगरपालिकेचे स्मशानभूमीवरील अंतिम संस्काराच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे कार्य आवश्यक कार्यामध्ये येत असूनसुद्धा जनतेच्या जनहिताच्या दृष्टिकोनातून सहकार्यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्य केलेले दिसत नाही.सदलगा नगरपालिकेतील मुख्याधिकारी गेल्या अनेक
दिवसापासून हजर झालेले नाहीत,नगरपालिकेतील नगरसेवक ही याकडे डोळेझाक का करतात हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे, त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेऊन सोडवण्यासाठी पावले उचलली पाहिजे होती.परंतु तसे झाले नाही.अलीकडेच सामान्य जनतेचे होणारे हाल पाहून शहरातील काही सेवाभावी
तरुण कार्यकर्त्यांनी अंतिम संस्कार करण्यासाठी शवदाहिन्या लोकवर्गणीतून बसविण्यात आल्याचे चांगले लोकोपयोगी चित्र दिसत आहे.हे सदलगा नगरपालिकेच्या दयनीय कारभाराच्या अव्यवस्थेचे अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे.” गावकरील ते नगरपालिका काय करील?” असा प्रश्न येथील सामान्य जनतेला
पडला आहे.वास्तविक पाहता स्मशानभूमीकडे अंतिम संस्कार साठी येणाऱ्या नातेवाईकांना व सामान्य जनतेला बसण्यासाठी निवारा,बैठक व्यवस्था,पाण्याची व्यवस्था,दिवाबत्तीची व्यवस्था या मूलभूत गरजा या ठिकाणी आढळत नाहीत.त्यामुळे सदलगा नगरपालिकाच मृता अवस्थेत आहे की काय? असे चित्र सध्या
तरी सदलगा शहरातील स्मशानभूमीकडे पाहिल्यानंतर दिसत आहे.सदलगा नगरपालिकेने या ज्वलंत प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन स्मशान भूमी येथे स्वतंत्र अंतिम संस्कार करण्यासाठी इमारत,रात्रंदिवस दिवाबत्तीची उत्तम सोय,24 तास मुबलक व
शुद्ध पाणी पुरवठा,बसण्यासाठी आसन व्यवस्था,व स्मशानभूमीसाठी कंपाउंड या सर्व सुविधा आपल्या शासकीय अनुदानातून उपलब्ध करून जनतेला सहकार्य करावे आणि जनतेचा दुवा घ्यावा असे सर्वसामान्य वर्गातून बोलले जात आहे.