दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन मिळणार सुलभ
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
येथील दत्त देवस्थानचा महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून तीर्थक्षेत्राचा उल्लेख आवर्जून केला जातो.या तीर्थक्षेत्रावर दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.गर्दीच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांना सोई सुविधा वाढवणेही गरजेचे आहे.
दरम्यान एका भाविकांच्या मदतीतून दत्त देवस्थान ट्रस्टने मंदिरासमोरील प्लॅटफॉर्मचे(पोर्च)विस्तारित करण्याचे काम हाती घेतले आहे.सुमारे दोन कोटीहून अधिक रकमेचे हे विकासकाम अंतिम टप्प्यात आले आहे.26 डिसेंबरला दत्त जन्म काळ सोहळा संपन्न होत आहे.
या निमित्ताने सुमारे तीन लाख भाविक एका दिवशी दर्शन घेतात.वर्षभरात अनेक धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांचा मेळा फुलतो.यामुळे मुख्य प्लॅटफॉर्मला लागून दक्षिण उत्तर प्लॅटफॉर्म नव्याने विस्तीर्ण होत आहे.
प्लॅटफॉर्म नव्याने बांधण्यात असल्यामुळे भाविकांची मुख्य कट्ट्यावर होणारी गर्दी आपोआपच विरळ होऊन हजारो भाविकांना धक्काबुक्की शिवाय दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.शिवाय मंदिराच्या धार्मिक व ऐतिहासिक लौकीकात अधिकच भर पडणार आहे.
या सुविधा निर्माण करताना या तीर्थक्षेत्राचे विकासात्मक दृष्टिकोनातून दत्त देवस्थान ट्रस्टचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.येथे महाराष्ट्र बरोबर कर्नाटक व गोवा प्रांतातून असंख्य भाविक येतात.दत्त दर्शनाने मनोभावे कृतार्थ होतात. प्रत्येक पौर्णिमेची वारी करणारे काही भाविक पायी येत असल्याचे चित्र दिसून येते.येथे वर्षाकाठी सुमारे 15 ते 20 लाख भाविक दत्त दर्शनासाठी येतात.
चौकट
येथील मंदिरात होणारी गर्दी वाढत आहे.यासाठी पुणे येथील भाविक श्री कुलकर्णी यांनी मंदिराच्या दक्षिण-उत्तर प्लॅटफॉर्मचे नियोजन देवस्थानच्या सहकार्याने हाती घेतले आहे.या प्लॅटफॉर्म कामी मंदिरासमोर सुशोभित फरशी उभी करण्यासाठी पुणे येथील भाविक श्री कुलकर्णी व देवस्थानचे माजी अध्यक्ष अशोकराव पुजारी,माजी सचिव राजाभाऊ पुजारी,दत्तात्रय रुके पुजारी देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष संतोष खोंबारे,सचिव विवेक हावळे तसेच सर्व विश्वस्त समस्त पुजारी वर्ग यांचे विशेष प्रयत्न यासाठी कारणीभूत ठरले आहेत.