श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात श्रीं चा
जन्मोत्सव सोहळा उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महाप्रसादाचे वाटप
शिरोळ / प्रतिनिधी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषणात येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि भक्तीमय व धार्मिक वातावरणात संपन्न झाला. श्री दत्त जयंती निमित्त श्री दत्तगुरु भोजनपात्र उत्सव समिती आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
श्री दत्त जयंती निमित्त रविवारी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. सकाळी ९.३० वाजता श्रीं च्या उत्सवमूर्तीस पंचामृत अभिषेक अर्पण करण्यात आला. सकाळी १० वाजता श्रींच्या हस्तकमालावरती महापूजा संपन्न झाली.सकाळी ११ वा ह.भ. प. श्री श्रेयसबुवा बडवे यांचे जन्मकाळाचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १२.१५ मी श्रीं चा मुख्य जन्मकाळ सोहळा मंदिराचे मुख्य पुजारी सर्वेश कुलकर्णी,अजित कुलकर्णी, वेदमूर्ती अनिकेत जोशी(महाराज),अच्युत कुलकर्णी,प्रल्हाद कुलकर्णी, चारुदत्त कुलकर्णी, दीपक कुलकर्णी,तसेच श्रींचे सेवेकरी ह भ प दत्तात्रय माने, तेजस फडतरे,विशाल धामणे यांसह पंचक्रोशीतील हजारो दत्तभक्त उपस्थित होते.श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर पुष्पवृष्टी करून सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.श्री दत्त जयंती निमित्त महाप्रसाद संयोजन समितीच्या वतीने येथील बाल शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.श्री दत्तगुरु भोजन पात्र मंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने गेली आठ दिवस नामांकित व्यक्तींचे भजन, कीर्तन, प्रवचन यासह अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात पहाटे अभिषेक, महापूजा, धुपारती, नित्य पालखी सोहळा केला जात आहे.श्रीं च्या उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तसेच शामियाना उभारण्यात आला आहे.सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला. रात्री श्री स्वामी समर्थ भजन रजनी शास्त्रीय व अभंगवाणी मंडळाच्या सौ दिपाली लोहार यांचा कार्यक्रम संपन्न झाला.रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.श्री दत्तगुरु अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी, शहरातील प्रमुख मान्यवर, आणि महाप्रसाद संयोजन समितीचे कार्यकर्ते, मंदिराचे पुजारी, व दत्तभक्तांनी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.