नृसिंहवाडी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं आज दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.यानिमितानं भाविकांनी ‘श्रीं’ च्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणारी अवघ्या सात वर्षांची चिमुकली भाविकांच्या सतर्कतेनं रंगेहाथ सापडली.ही आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी सुमारास नृसिंहवाडी येथे घडली.दत्त जयंती निमित्त महाराष्ट्र,कर्नाटकसह विविध राज्यातील भाविक नृसिंहवाडीत दाखल झालेत.यावेळी श्रींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कर्नाटकातील मंगावती इथल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ब्लेडनं कापण्यात आलं.मंगळसुत्र कापलं गेल्याचं लक्षात येताच त्या महिलेनं संशयित लहान मुलीचा हात पकडला.तिच्याकडं कापलेले मंगळसुत्र आणि ब्लेडचा तुकडा सापडला. संबधीत मुलीला नृसिंहवाडी दूरक्षेत्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.आज दुपारपर्यंत भाविकांचे दोन मोबाईल चोरीला गेल्याची पोलीस चौकीत नोंद झालीय.दरम्यान, भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू,मोबाईल यांची काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी भाविकांना केले आहे.