हातकणंगले / प्रतिनिधी
आपल्या मित्रासोबत हातकणंगले जवळील रामलिंग येथे देवदर्शन करून परतत असताना दुचाकी घसरून संरक्षक भिंतीला आपटल्याने मानस विजय जाधव (वय २२) रा. रुई या तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.याबाबत अधिक माहीती अशी रुई व परिसरातील हातकणंगले येथील काही तरुण मित्र शुक्रवारी सकाळी रामलिंग येथे देवदर्शनासाठी गेले होते, देवदर्शन करून सायंकाळी परत येत असताना मानस विजय जाधव या तरुणाची दुचाकी घसरून रस्त्यालगत असलेल्या सिंमेटच्या संरक्षक भिंतीला जोरात आपटल्याने ते दोघेही गंभीर जखमी झाले.सोबत असणाऱ्या इतर मित्रांनी त्या दोघांना तात्काळ इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र डोक्याला जोराचा मारा लागल्याने उपचारा दरम्यान शुक्रवारी रात्री मानस जाधव याचा मृत्यू झाला तर जखमी मित्रावर उपचार सुरू आहेत.घटनेची नोंद शिवाजीनगर (इचलकरंजी ) पोलीस ठाण्यात झाली असून शवविच्छेदन इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात करण्यात आले.मानसने नुकताच टेस्टाईल शाखेतून पदवी प्राप्त केली होती.काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबई येथील मर्चंट नेव्ही येथे मुलाखत दिली असून सोमवारी नोकरीवर रुजू होणार होता पण काळाने घाला घातल्याने त्याचे आणि कुटुंबियांचे स्वप्न अपूर्णच राहिले. हाता तोंडाशी आलेल्या मानसच्या दुर्देवी मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.