नृसिंहवाडी / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज दत्त जयंती सोहळा असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंती सोहळा असा दुहेरी संगम सोहळा आज संपन्न होणार असल्याने रात्री बारा वाजेपासून नृसिंहवाडी – शिरोळ – कुंरुदवाड मार्गावर शैकडो भविक दत्त नामाचा जप करीत थंडीत येत होते.
दत्त जयंती निमित्त आज पहाटे चार वाजल्यापासून मंदिर परिसर गर्दीने फुलून गेले होते.उत्सवानिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती,षोडशोपचार पूजा,पंचामृत अभिषेक,महापूजा अदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाले.दुपारी चार वाजता श्री उत्सव मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणण्यात आली.यानंतर सायंकाळी पाच वाजता श्री चा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.अबीर गुलालाची उधळण करीत ” दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” जयघोषात दत्त जयंती सोहळा संपन्न झाला.रात्री उशिरा धूप, दीप,आरती,पालखी सोहळा संपन्न झाला.जन्मकाळ सोहळ्यानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण पुजारी यांच्या घरी श्री चा पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि देखावा साजरा करण्यात आला होता.श्री दत्त गुरू ची जन्मकाळांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.आज दिवसभरात महाराष्ट्र, कर्नाटक,गोवा अदि राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांनी दत्त दर्शन घेतले.गर्दीचे नेटके नियोजन करण्यासाठी शिरोळ पोलीसांनी एकेरी वाहतूकसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी पकिग व्यवस्था, पिण्याचे पाणी,अदि व्यवस्था करण्यात आली होती. कुंरुदवाड एस.टी आगार महामंडळाच्या वतीने जादा गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या.व्हाईट आर्मी, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ,दत्त मंदिर हायस्कूल चे विद्यार्थी एन. सी.सी चे विद्यार्थी याच्यासह पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्रा सुतार,उपसरपंच रमेश मोरे,धनाजीराव जगदाळे,ग्रामविकास अधिकारी एस.पी.कांबळे यांनी नेटके नियोजन केले.कृष्णा नदीपात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नावाडी भूषण गावडे,संकेत गावडे याच्यासह व्हाईट आर्मी,वजीर रेस्क्यू फोर्स चे जवान तैनात करण्यात आले होते.