प्रतिभा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
शिरोळ / प्रतिनिधी
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाद्वारे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शिरोळची सुकन्या कु. प्रज्ञा श्रीकांत माळकर व कु. शांभवी श्रीकांत माळकर या बहिणीनी अनुक्रमे वरिष्ठ व कनिष्ठ गटात द्वितीय क्रमांक पटकावला.महाराष्ट्रातील अतिशय नामांकित समजल्या जाणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेत सांगली , सातारा , सोलापूर, रत्नागिरी , पुणे , मुंबई , पनवेल अशा अनेक ठिकाणच्या बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत कु. प्रज्ञा हिने वरिष्ठ गटातून बोलताना ” प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा ” या विषयावर तर कु. शांभवीने कनिष्ठ गटातून बोलताना ” विद्यार्थी जीवनात मूल्य शिक्षणाचे महत्त्व ” या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. दोघींनाही मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कु. प्रज्ञा ही सांगलीच्या श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल सुगते , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.उर्मिला क्षीरसागर व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.तर कु. शांभवी ही येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. पद्माराजे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सची विद्यार्थिनी असून तिला महाविद्यालयाचे प्राचार्य ए. ए.मुल्ला , विभागप्रमुख श्री.कुंभार सर व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.याच स्पर्धेत प्रज्ञा व शांभवी यांचा मोठा भाऊ शिवम संजय माळकर ( भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगली ) याने 2022/ 23 मध्ये विजेतेपद पटकावले होते. या यशाबद्दल माळकर भावंडांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.