नृसिंहवाडी / प्रतिनिधी
‘दिगंबरा दिगंबरा’च्या अखंड गजर व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात नृसिंहवाडीतील कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर दत्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिरमार्गावर भाविकांनी गर्दी केलीय.कृष्णा नदीत स्नान करून भाविक दत्त दर्शन घेताना दिसून येत आहेत.दत्त देवस्थानच्या वतीने मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शनरांगेचे नियोजन केल्याने भाविकांना दत्त प्रभूंचे दर्शन सुलभ झाले आहे.दत्त जयंतीनिमित्त मंदिरात गेली सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत.आज मंदिरात पहाटे काकड आरती व षोडशोपचार पूजा,सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना’ पंचामृत अभिषेक पूजा होणार आहे.तर सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार असल्याची माहिती दत्त देवस्थानचे अनंत पुजारी यांनी आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता नृसिंहवाडी येथे दिली.श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात,कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.दत्त देव संस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायतचे सदस्य,शासकीय अधिकारी,वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान,एस के पाटील व दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलचे विधार्थी स्वयंसेवकांनी तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन उत्सवाचे नेटके नियोजन केले आहे.तरी भाविकांनी शांततेत दत्त प्रभूंचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री नृसिंह सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.