शिरोळ / प्रतिनिधी
परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात घडलेल्या घटनेमुळे आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.भारतीय संविधान हा आपल्या देशाचा पवित्र ग्रंथ असून, त्यावर आधारित देशाचे शासन चालते. संविधानाचा अपमान हा देशाच्या एकतेवर आणि समतेवर घाला असल्याने आंबेडकरी समाजाकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत संबंधित दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष शिंदे म्हणाले की, परभणी पोलिस प्रशासनाने भीमनगर परिसरात कोबिंग ऑपरेशन सुरू केले असून, त्यादरम्यान काही भिमसैनिकांवर लोखंडी रॉडने मारहाण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे संतप्त आंबेडकरी समाजाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, नांदेड विभागाचे पोलीस आयुक्त सहाजी उमप यांच्यावरही निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी अभिजीत अलासकर, सुहास कांबळे, संदीप बिरणगे, अनिल लोंढे, शशिकांत टोपरे, वाईट पठाण, चंद्रकांत तोबरे, विक्रम माने, सूरज शिंगे, आलोक कडाळे, नंदू कांबळे, अजिंक्य कुरुंदवाडे, सतीश ढाले, अमोल कांबळे यांसह आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपला तीव्र निषेध नोंदवला.