आजची परिस्थिती आणीबाणीसारखी,साहित्यिकांनी उठाव करावा उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन

स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

साहित्यिकांना लिहिण्या आणि बोलण्यापासून रोखता कामा नये. त्यांनी बोलायलाच हवे.आणीबाणीच्या कालावधीमध्ये साहित्यिकांनीच उठाव करून सरकारला आणीबाणी उठविण्यास भाग पाडले होते.आजची परिस्थिती ही तशीच आणीबाणीसारखी आहे.पुन्हा एकदा साहित्यिकांनी तसा उठाव करून आपल्या साहित्यामार्फत लोकांना विचार करायला लावणे महत्त्वाचे आहे.यासाठी साहित्यिकांनी विचाराची दृष्टी ठेवून काम करावे असे आवाहन इंद्रधनुष्य मासिकाचे संपादक तथा श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली आयोजित स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावायची असेल तर सर्वच शिक्षकांचा एक दिवसीय मेळावा घ्यावा आणि विद्यार्थ्यांना कसे घडवावे, प्रेम, आदर त्यांच्यात कसे निर्माण करावे, यासंदर्भामध्ये सर्वांगीण मेळावा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मुख्य ऑफिसच्या मीटिंग हॉलमध्ये गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू, ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी, ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्रा. डॉ. मोहन पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे यांनी कथा स्पर्धेच्या अनुषंगाने साहित्यिकांची भूमिका स्पष्ट केली आणि आजच्या परिस्थिती मध्ये आपली ठोस भूमिका घेऊन साहित्याची निर्मिती करण्याची जबाबदारी पेलण्याचे आवाहन केले. मंदार अयाचित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विजयराज कोळी यांनी सर्व मान्यवरांना भगवदगीता भेट म्हणून दिली.प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. साहित्य सहयोग दीपावली अंकाचे संपादक सुनील इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी तर आभार मासिक इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी मानले.श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक अरुणकुमार देसाई, बाळासो पाटील हलसवडे, रावसाहेब नाईक, शेखर पाटील, अमरसिंह यादव, भैय्यासो पाटील, नीलम माणगावे, रावसाहेब पुजारी, विश्वजीत शिंदे, संजय यादव, डॉ. दगडू माने, राजेंद्र प्रधान, बाळासाहेब कांबळे, प्रसाद वाघमोडे, अश्विनी माळी, साहित्यप्रेमी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण समारंभ झाला.

Spread the love
error: Content is protected !!