हलगी वाजवून लोककलाकरांनी केलं गटविकास अधिकाऱ्यांना जागं

हलगी वादन,विविध वेशभूषा साकारून लोककलाकारांनी प्रशासनाचे वेधले लक्ष

 शिरोळ / प्रतिनिधी
शासनाकडून राजर्षी शाहू महाराज जेष्ठ लोककलाकार मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे.मानधनाचे प्रलंबीत प्रस्ताव त्वरीत मंजुर करावेत.स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत कलाकारांच्या नोंदी ठेवून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात यावे यासह अन्य मागणीसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीने आज सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हलगी वाजवून निवेदन देण्यात आले.यावेळी हलगी वादनाचा कडकडाट,कलाकारांचा उस्फुर्त सहभाग आणि कलाकार सुनील धनवडे यांनी कडक लक्ष्मीची पोतराज तर डॉ.दगडू माने यांनी धनगरी वेशभूषा साकारल्याने  सर्वांचे लक्ष वेधले होते.प्रारंभी येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केले.त्यानंतर हलगीवादन करीत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश साजगाणे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,राज्य शासनाने कलाकारांच्यासाठी महिना ५ हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.जेष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारात समाधान आहे.मात्र या कलाकारांना प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या तक्रारीमुळे मानधन रक्कम हाच आधार आहे.तांत्रिक अडचणींमुळे केवळ  दोन-चार महिन्याचे काही कलाकारांना मानधन देण्यात आले आहे.मात्र कोणत्या महिन्यातील किती मानधन याविषयी स्पष्टता मिळत नसल्याने कलाकार संभ्रमात आहेत. सदरचे निवेदन स्वीकारून त्यांनी मागण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना कळवू असे आश्वासन दिले.यावेळी जेष्ठ कलाकार लखन कांबळे,डॉ दगडू माने,राजेंद्र प्रधान,सुनील धनवडे,विशाल कांबळे – टाकवडेकर,बळीराम कांबळे,चंद्रकांत चौगुले,जयवंत पवार,गजानन आवळे,भगवान आवळे,मधुकर निकम, शिवाजी गंगधर,सचिन कमलाकर वसंत चुडूमुंगे,उत्तम बिरणगे,मारुती कोळी,उदय शिरोळकर,आनंदा कुंभार, देवगोंडा पाटील,किरण खोत शैलेश कांबळे,आशुतोष बिरणगे,आकाश बिरणगे, सतीश शिंगे,सतीश हावजे, पवन शिंगे,रेश्मा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ,दिगंबर सकट,सदाशिव आंबी,एम.एस.कांबळे, प्रविणकुमार माणंगावे यांनी कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा जाहिर केला.
आणि हलगी कडाडली…
शिरोळ येथील लोककलाकार डॉ दगडू माने यांनी पथनाट्य,नाट्य -अभिनय ते चित्रपट सृष्टीत प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख निर्माण केली आहे.कलेचे संवर्धन होऊन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी तालुक्यात लोककलाकारांचे चांगले संघटन केले असून सोमवारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यापूर्वी डॉ दगडू माने यांनी स्वतःहलगी (रणवाद्य) वाजवून प्रशासनाला जागे राहण्याची विनंती केली.हलगी वाजताच उपस्थितीतही अवाक झाले.
Spread the love
error: Content is protected !!