इचलकरंजी / प्रतिनिधी
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीत सकल हिंदूच्यावतीने मानवाधिकार हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा मंगळवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता शिवतीर्थ ते प्रांत कार्यालय या मार्गावर काढण्यात येणार आहे,अशी माहिती सनतकुमार दायमा, बाळ महाराज यांनी आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता इचलकरंजी येथे पत्रकार परिषदेत दिली.बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेले अमानवीय अत्याचार हे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे.त्याविरोधात जागृती करणे आणि समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविणे हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे.भारतीय संविधानाने शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार दिला असून, नागरिक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे.तसेच ज्या नागरिकांना मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही, त्यांनी दंडावर काळी फीत बांधून बांगलादेश सरकारचा निषेध करावा.तसेच,शहरातील मंदिरांमध्येही महाआरती घेऊन बांगलादेशातील हिंदू बांधवांसाठी प्रार्थना करण्यात येईल.हिंदू न्याय यात्रा दरम्यान,प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाईल.या माध्यमातून हिंदूंवरील अत्याचारांची दखल घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यावेळी श्रीवास पंडित दास, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, पंढरीनाथ ठाणेकर, योगेश जेरे, विजय पाटील, सर्जेराव कुंभार, दत्ता पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.