पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पेठवडगाव येथील कोल्हापूर रोडवर असणाऱ्या सचिन दत्तात्रय कदम यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून वीस तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख असा सुमारे अठरा ते विस लाखांचा ऐवज चोरटयानी लंपास केला.तसेच पोलीस स्टेशन समोरील दत्तनगर येथेही अशाच प्रकाराने सोने व रोख रक्कम चोरी करण्यात आली.येथील कोल्हापूर रोडवर गणेश मंदिरसमोर सचिन दत्तात्रय कदम राहत असुन .पुणे येथे नातेवाईकांचे लग्न समारंभ असल्याने शुक्रवारी दुपारी ते घराला कुलूप लावुन सहकुटुंब पुण्याला गेले होते. या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवत घरी कुणी नसल्याचे पाहून शनिवारी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बाजूस असलेल्या खोलीमध्ये प्रवेश करून तिजोरी कटावणीने उचकटली. आतील साहित्य विस्कटले होते . लॉकर तोडून चोरट्याने लॉकर मधील लहान मुलांच्या दोन चेन, लहान चार अंगठी , कोल्हापुरी साज, सोन्याचा हार, गोल हार, मोहन माळ, गंठण, चांदीचे नाणी, ठेव पावती, कानातील फुले,असे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने व आई सुमन कदम यांच्या पेन्शनचे काढून आणलेली दोन लाख रुपये इतकी रक्कम असा सुमारे अठरा ते विस लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.अशाच पद्धतीने दत्तनगर येथील बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह शाहूवाडी तालुक्यातील विरळे या ठिकाणी गेले होते.त्यांच्या शेजारी असणाऱ्या घरांना कड्या घालण्यात आल्या.त्यांच्याही घराचे कुलुप तोडून तिजोरी कटावणीने उचकटुन तिजोरीतील चार ग्रॅमची अंगठी, सोन्याचे मणी व रोख रक्कम १७ हजार असा पाऊण लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सपोनि कैलास कोडक, संतोष माने, शहाबाज शेख रवींद्र करमळकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.याबाबत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.