कोथळी / प्रतिनिधी
शेतात खतासाठी बसवण्यात आलेल्या मेंढराच्या कळपातून भर दुपारी दोनच्या दरम्यान तीन चोरट्यांनी मोटरसायकल वरून कोकरू चोरून नेण्याची घटना कोथळी तालुका शिरोळ येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या घडली आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मेंढपाळांच्यात घबराट पसरली आहे पोलिसांनी या भुरट्या चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी मेंढपाळ वर्गातून होत आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कोथळी – मंगेश्वर रस्त्यादरम्यान गावापासून काही अंतरावर छोटू देखांण्णा यांच्या शेतात खतासाठी सुनील बिरू पुजारी यांनी गेल्या आठ दिवसापासून मेंढरे बसविण्यात आली आहेत.शुक्रवारी दिनांक डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या तीन चोरट्यांनी दोन कोकरे घेऊन गाडीवर बसत होते.हा प्रकार लगतच झाडाखाली बसलेल्या आप्पा धनगर या वृद्धाच्या निदर्शनास आला.त्याने आरडाओरडा करून तुम्ही कोण आहात असे विचारले असता चोरट्यांनी एक कोकरू सोडून 5 महिन्याच्या एका कोकराला घेऊन कोथळीच्या दिशेने धूम ठोकली.या घटनेनंतर आज कोथळी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघे चोरटे गाडीवरून कोकरू घेऊन गेल्याचे दिसत आहे.या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसात दिल्याचे पैलवान रवी पुजारी यांनी सांगितले.तर यापूर्वी वर्षभरात संभाजी पुजारी,राजू पुजारी,महादेव पुजारी यांच्यासह पाच जणांची खतासाठी बसवण्यात आलेल्या ठिकाणावरून दिवसा कोकरे चोरीस गेल्याचे सांगण्यात आले.पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन वारंवार घडणाऱ्या घटना थांबवण्यात व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेंढपाळ वर्गातून होत आहे.