गजबजलेल्या रस्त्यावर ऊसाने भरलेली ट्रॉली उलटली…

अब्दुल लाट / प्रतिनिधी

 

अब्दुललाट ता शिरोळ येथे मुख्य चौकात शेतांमधून तोडणी करून कारखान्याच्या दिशेने जात असलेल्या उसाने भरलेली ट्रॉली बघताक्षणी काही सेकंदातच पलटी झाली आहे.या अपघातामध्ये थोडक्यात सुदैवाने मोठी हानी टळली आहे.भर रस्त्यात आणि नेहमी गजबजलेल्या मुख्य चौकात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.ही घटना आज रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की अब्दुललाट – शिरदवाड रस्तावर मुख्य चौकात वळण रस्तावर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातून हुपरी येथील जवाहर साखर कारखाना ऊस घेऊन जात असताना अचानक ट्रॉलीचे पुढे चाक निघून पडल्याने ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली आहे.यावेळी सुदैवाने त्या परिसरात कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र आजच्या या घटनेमुळे घटनास्थळी असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.ट्रॉली उलटली व ट्रॉली मधील सर्व ऊसाचा ढिगारा रस्ताच्या मध्यभागी कोसळला.हा मुख्य चौक असून या ठिकाणी नेहमी वर्दळ असते,या ठिकाणाहून इचलकरंजी कोल्हापूर यासह कर्नाटक आदी ठिकाणी जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे येथे नेहमी गर्दी असते.दरम्यान काही क्षणात ट्रॉली पलटी झाल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. घडलेल्या सर्व प्रकारामुळे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरीकांनी धाव घेऊन वाहतूक कोंडी हटविण्याचे काम सुरू केले. सध्या सर्वत्र कारखान्यांमध्ये उसाचा गळीत हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणावर सर्वत्र उसाची वाहतूक केली जात आहे.अशावेळी अपघाताच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काळजी घेऊन ऊसाची वाहने चालविण्याचे आवाहन परिवहन मंडळ व पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे.

Spread the love
error: Content is protected !!