कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये आणि मदतीसांना वीस हजार रुपये दरमहा मानधन मिळावं या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि जोरदार घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन केलं आहे.राज्यभरातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारात थाळीनाद करत शासनाचं लक्ष वेधले आहे.
यावेळी दोन्ही प्रवेशद्वार अडवल्याने वाहतुकीची देखील मोठी कोंडी निर्माण झाली अंगणवाडी सेविकांनी आपल्या सोबत आणलेल्या थळ्या नाद करून जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी मुश्रीफ यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांच्या प्रश्नासाठी महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी योग्य ती चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.
मात्र जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवून आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे कॉम्रेड जयश्री पाटील यांनी दिला आहे.