जयसिंगपूर /अजित पवार
राज्याच्या सत्ताकारणात उलथा-पालत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक गट आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक गट अशी सद्यस्थिती आहे. पण या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे कार्यकर्ते सध्या जोमाने कामाला लागले आहेत. तर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना शिरोळ तालुक्यात ‘ म्होरक्या ‘ सापडेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्याच्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष सीगेला पोहोचला आहे. पक्षाचे प्रमुख कोण याबाबत निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर फैसला होणे बाकी आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना पक्षाच्या सीमारेषेवर असलेले कार्यकर्ते मात्र नेमके कोणत्या गटात सामील व्हायचे याची चाचपणी करताना दिसत आहेत.
निमशिरगांव (ता.शिरोळ) येथे स्वातंत्र्यसेनानी श्री.पी.बी.पाटील निमशिरगांव विकास सोसायटीच्या नुतन इमारतीचे उदघाटन, नामकरण सोहळा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमा दरम्यान शरद पवार यांनी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षाची ध्येय धोरणे समाजापर्यंत पोहोचवण्याकरता उभारी देण्याचे काम केले.
यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कार्यक्रमाला शिरोळ तालुक्यातील या गटाचे नेते आणि पूर्वाश्रममीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांनी आपल्या समवेत माजी सरपंच बापूसाहेब दळवी, केशव राऊत, जिनगोंडा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार यांची भेट घेतली.
त्याचबरोबर तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, शिरोळचे माजी सरपंच बी.जी. माने, तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील या तालुक्यातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी गाठभेट घेतली. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही मोठा समावेश होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.
परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात अद्याप तरी अस्वस्थता आहे. ना त्यांचा शिरोळ तालुक्याचा दौरा झाला आहे. अथवा त्यांच्या संपर्कात कोणते कार्यकर्ते आहेत. याबाबत अजून अस्पष्टता आहे. अजित पवार यांच्या संपर्कात आपण असल्याबाबत अध्याप तरी कोणत्याही कार्यकर्त्याने स्पष्ट केले नाही. यामुळे सध्या त्यांच्या गटाला ‘ म्होरक्या ‘ सापडत नसल्याची चर्चा शिरोळ तालुक्यात जोरदार आहे.
चौकट..
माणगावे परिवाराचा जिव्हाळा..
निमशिरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात जयसिंगपूर येथील सावकार गणपती प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा विजय माणगावे व विश्व माणगावे यांनी शरदचंद्र पवार यांचा शाहू महाराज यांची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यामुळे माणगावे परिवाराचा पवार कुटुंबावर असलेला जिव्हाळा यामध्ये दिसून आला.