समाज घडवणारा मनुष्य म्हणजे पत्रकार : उद्यानपंडित गणपतराव पाटील
श्री दत्त उद्योग समूह व पत्रकारांचे ऋणानुबंध दृढ : अशोकराव कोळेकर
शिरोळ / प्रतिनिधी
सर्वसामान्य न्याय मिळावा यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे पत्रकारच समाज घडविणारे मनुष्य म्हणून ओळखले जातात पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्यात आधुनिक तंत्रज्ञानाची जागृती करावी असे
आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी दैनिक महान कार्यचे संपादक विजय पवार,संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव उर्फ आबा जावळे,संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक युवकांचा नवा महाराष्ट्रचे संपादक अशोकराव कोळेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी दैनिक नव्या युगाचा नवाभारतचे संपादक सुनील इनामदार यांची निवड झाल्याबद्दल उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव कोळेकर म्हणाले की श्री दत्त उद्योग समूह आणि पत्रकारांचे ऋणानुबंध दृढ आहेत हा उद्योग समूह नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी राहिला आहे.पत्रकारांनीही दत्त उद्योग समूहाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलला आहे.स्वर्गीय डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांनी अडचणीच्या काळात पत्रकारांना मदत केली आहे.पत्रकार समाजात परिवर्तन घडावे यासाठी तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र झटत असतो त्यांना मदत व्हावी याकरिता संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असे शेवटी त्यांनी सांगितले.
संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय पवार म्हणाले की पत्रकार नेहमीच तळागाळातील प्रश्न सोडवून जनतेला न्याय देण्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असतो.न्याय हक्काच्या लढा देत असताना तो आपल्याला कोणते परिणाम भोगावे लागतील याची तमा न बाळगता काम करीत असतो अशा पत्रकारांना पाठबळ देण्याचे काम दत्त उद्योग समूहाने नेहमीच केले आहे.सध्या पत्रकारितेमध्ये नवनवीन बदल होत आहे हे बदल पत्रकारांनी आत्मसात करून समाजाला दिशा देण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजय जाधव उर्फ आबा जावळे म्हणाले की समाजाच्या प्रगतीसाठी पत्रकारांनी मोलाचे योगदान दिले आहे.वृत्तपत्र चालवत असताना अनेक अडचणीचा डोंगर पेलावा लागत आहे.जीएसटीने तर सर्वांचे कंबरडे मोडले आहे.पेपर शाई याचे दर गगनाला भिडले आहेत, यामुळे येणाऱ्या काळात वृत्तपत्र टिकवण्यासाठी प्रत्येकाने मदतीची भावना ठेवली पाहिजे निर्भीड निःपक्ष लिखाण करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या परिसरातील नेहमीच पत्रकार प्रयत्नशील आहेत.संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील इनामदार म्हणाले की समाजात परिवर्तन घडवण्यासाठी पत्रकारांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे.पत्रकारांच्यामुळेच रखडलेले जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला जातो. प्रशासन आणि समाज याचा दुवा म्हणून काम करताना विधायक आणि सामाजिक कार्यात येथील पत्रकार नेहमीच अग्रेसर राहतील असे आश्वासन दिले.ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी म्हणाले की शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकार एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विजय पवार यांनी पुढाकार घेतला.यामुळे संपादक व पत्रकार सेवा संघाची या ठिकाणी शाखा निघाली आहे.पत्रकारांच्या या एकीचा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित फायदा होईल कोणताही द्वेष लोभ मत्सर न ठेवता पत्रकारांच्या प्रगतीसाठी एकत्रपणे काम करून समाजाला दिशा देण्यासाठी हा संपादक व पत्रकार सेवा संघ प्रयत्नशील राहील असे सांगितले.पत्रकार डॉ दगडू माने यांनी स्वागत केले.यावेळी शिरोळ तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे,शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील,पत्रकार चंद्रकांत भाट, संदीप बावचे, दत्तात्रय कदम, राजेंद्र प्रधान,अजय जाधव,रणजीत जाधव,धर्मराज जाधव,विष्णू जाधव,बाळासाहेब आडसूळे, उद्योगपती दिलीप पाटील कोथळीकर, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील कणंगलेकर, दत्त कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादासो काळे, शक्तीजीत उर्फ चिकू गुरव यांच्यासह पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.